सर्वच कोरोनाबाधीतांना "महात्मा फुले' योजनेचा लाभ द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू... 

घनश्‍याम नवाथे 
Saturday, 8 August 2020

जिल्ह्यातील खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या दहा ते पंधरा टक्के रूग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार होतात. इतर रूग्णांकडून भरमसाठ बिलांची आकारणी केली जाते.

सांगली : जिल्ह्यातील खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या दहा ते पंधरा टक्के रूग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार होतात. इतर रूग्णांकडून भरमसाठ बिलांची आकारणी केली जाते. 50 हजार रुपये ते दीड लाख रुपयांचे बील खासगी रुग्णालयांकडून आकारले जाते. त्यामुळे सर्वच कोरोनाग्रस्तांना थेट महात्मा फुले योजनेचा लाभ द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिला आहे. 

ते म्हणाले, ""जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल चार हजार रूग्ण आढळले आहेत. शासकीय रूग्णालयातील खाटा भरल्या आहेत. खासगी रूग्णालयातील काही खाटा जिल्हा व महापालिका प्रशासनाने राखीव ठेवल्या आहेत. मात्र तिथे रूग्णांची लुबाडणूक सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. कोरोना रूग्णांवर शासनाने महात्मा फुले योजनेतून उपचार होणार असल्याचे जाहीर केले. मात्र जिल्ह्यात परिस्थिती वेगळी आहे. केवळ दहा ते पंधरा टक्के रूग्णांची बिले या योजनेतून माफ होतात. 

इतरांना दीड लाखापर्यंत बिले भरावी लागतात. रूग्ण व नातेवाईकांचे कंबरडे मोडत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन सर्वांचे महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार करावेत. अन्यथा आंदोलन करावे लागेल.'' 
ते पुढे म्हणाले, ""भविष्यात रूग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. मिरज शासकीय रुग्णालयाची क्षमता 500 खाटांची आहे. तेथे वाढीव खाटांची सोय करावी. तसेच होम आयसोलेशनची संख्या वाढवावी. तसेच सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक स्वतंत्र विभाग कोरोनासाठी दिल्यास तिथे 100 खाटांची व्यवस्था होईल. सांगलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये अजूनही क्षमतेपेक्षा कमी रुग्ण दिसतात. प्रत्यक्षात कोरोनाग्रस्तांना खाटा उपलब्ध होत नाहीत. सांगलीचे जादा रुग्ण इस्लामपूर येथील हॉस्पिटलमध्ये पाठवावेत.'' 

होम आयसोलेशन रूग्णांना दिलासा द्या- 
रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरातच उपचार केले जावेत. त्यासाठी आशा वर्कर्स मार्फत जी सेवा दिली जाते, त्याऐवजी आयुष डॉक्‍टर अथवा तज्ज्ञांची दोन दिवसांतून एक व्हिजिट करावी. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळून रूग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देतील. ही व्यवस्था बळकट झाल्यासच रुग्णालये गंभीर रुग्णांसाठी उपलब्ध होतील असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 
.............. 

संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give the benefit of "Mahatma Phule" scheme to all the corona victims