लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या... यांनी केली पंतप्रधान यांच्याकडे मागणी

अजित कुलकर्णी
Sunday, 26 July 2020

सांगली- साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. एका विशेष पत्राद्वारे त्यांनी अण्णाभाउ साठे यांच्या जीवनकार्याचा वेध घेत सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी केली आहे.

सांगली- साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. एका विशेष पत्राद्वारे त्यांनी अण्णाभाउ साठे यांच्या जीवनकार्याचा वेध घेत सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी केली आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वाटेगाव (ता.वाळवा) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी त्यांनी मराठी साहित्यातील लोक वाड:मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन अशा सर्वच क्षेत्रात दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे. साहित्यासह लोककलांचे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले आहेत. तसेच तमाशा कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून दिली. 

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी त्यांनी लोकांमधून मोठी जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्येही त्यांनी शाहिरीतून मोलाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाड्याच्या माध्यमातून रशियापर्यंत पोहवण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले. 1 ऑगस्ट 2020 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. साहित्य क्षेत्रातील कर्तृत्व व त्यांची किर्ती पाहता भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी राज्य शासनाकडून शिफारस होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विधानसभा व विधान परिषदेत ठराव होणे महत्त्वाचे असते. मात्र, कोरोनामुळे ते शक्‍य नसल्याने राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही पत्राद्वारे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती पाठवत सर्वोच्च पुरस्कार देण्याची विनंती केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Bharat Ratna to Lokshahir Annabhau Sathe . he demanded from the Prime Minister