आमच्या लेकीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या...

शिवाजी चौगुले
Tuesday, 26 January 2021

लेकीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या, अशा घोषणा देत हजारांवर ग्रामस्थांनी आज शिराळा तहसीलवर मोर्चा काढला. देववाडी (ता. शिराळा) येथील विवाहिता रूपाली खोतचा खून करणाऱ्या संशयित धनाजी खोतला कठोर शासन व्हावे यासाठी हे आंदोलन झाले. आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला आहे. 

शिराळा : लेकीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या, अशा घोषणा देत हजारांवर ग्रामस्थांनी आज शिराळा तहसीलवर मोर्चा काढला. देववाडी (ता. शिराळा) येथील विवाहिता रूपाली खोतचा खून करणाऱ्या संशयित धनाजी खोतला कठोर शासन व्हावे यासाठी हे आंदोलन झाले. आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला आहे. 

लक्ष्मी चौक येथे सुरुवात झाली. कापरी नाका, शिराळा बस स्थानकमार्गे मोर्चा तहसील येथे आला. महिलांचा सहभाग मोठा होता. शिराळा परिसर घोषणांनी दुमदुमला. मोटारसायकलींसह तरुणही सहभागी होते. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार आरुषी सिंग यांना निवेदन देण्यात आले. आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले,""शक्ती कायद्यांतर्गत शिक्षा होईलच. पोलिसांनी या घटनेचा तपास कसून करून पीडित महिलेच्या कुटुंबाला न्याय द्यावा. लोकांनी सहकार्य करावे.'' 

शिवाजीराव नाईक म्हणाले,""संशयिताला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा.'' डॉ. उषाताई दशवंत म्हणाल्या,""मुलांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.''  ऍड. रवी पाटील म्हणाले,""शिराळा बार असोसिएशनचे सभासद संशयिताचे वकीलपत्र घेणार नाहीत.'' रेखा खोत म्हणाल्या,""संशयिताकडून यापूर्वी झालेल्या वर्तनाबद्दल महिलांनी पुढे येऊन तक्रार देण्याची गरज आहे.'' 

तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले,""पोलिसांमार्फत सखोल तपास करण्याचे काम सुरू आहे.'' सरपंच संजना वरेकर, रेखा खोत, संगीता साळुंखे, ऍड. रवी पाटील, संपतराव देशमुख, राम पाटील, सुखदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार सिंग, तहसीलदार गणेश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, संपतराव देशमुख, महादेव कदम, अश्विनी नाईक, रणजीतसिंह नाईक, केदार नलवडे, वैशाली माने, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक, श्रीराम नांगरे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

प्रमुख मागण्या :
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. कायदेशीर सल्लागार ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. संशयितास फाशीची शिक्षा व्हावी. पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत किंवा उपजीविकेचे साधन मिळवून द्यावे. मुलांना शैक्षणिक सुविधा व शिष्यवृत्ती मिळावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 

अन्‌ त्यांच्या अश्रूला बांध फुटला... 
पिडीत महिलेला न्याय मिळावा व मुलांना मदत करावी, असे मनोगत अनेकजण व्यक्त करीत असताना महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वातावरण भावूक झाले होते.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give justice to our girl, hang the culprit ...