नव्या लोकांना संधी द्या, जि. प.त खांदेपालट करा... 

अजित झळके
Saturday, 19 December 2020

जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षभर कामाची चांगली संधी मिळाली. कोरोना रोगाच्या संकटात त्यांनी आपली कर्तबदारी दाखवून दिली. आता नव्या लोकांना संधी द्यावी.

सांगली : जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षभर कामाची चांगली संधी मिळाली. कोरोना रोगाच्या संकटात त्यांनी आपली कर्तबदारी दाखवून दिली. आता नव्या लोकांना संधी द्यावी. नेत्यांनी खांदेपालट करावे, अशी मागणी भाजपचे सदस्य सरदार पाटील आणि अरुण बालटे यांनी आज केली. त्यामुळे पदाधिकारी बदलाची वात आता पेटली आहे. 

ते म्हणाले,""जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे. येथे काम करण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी मोठीच बाब आहे. परंतु, व्यापक कामाची संधी प्रत्येकाला येथे मिळायला हवी. तशी संधी पहिल्या टप्प्यात मिळाली. दुसऱ्या टप्प्यातही पदाधिकाऱ्यांना चांगले काम करता आले. कोरोना काळ आपत्ती नसून चांगले काम करण्याची सुपत्ती होती. या संकटात खूप चांगले काम करून दाखवण्यात आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, चारही सभापतींनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊन त्यांनी काम केले आहे. आरोग्य विषयक यंत्रणा प्रभावी राबवली गेली. शाळा बांधकामाला मान्यता मिळाली. बांधकाम विभागाची कामे तर झपाट्याने झाली. जिल्हा नियोजनाचा निधीही आता शंभर टक्के मिळाला असून पुढील एक-दोन महिन्यांत कामे होतील.'' 

ते म्हणाले,""गेल्यावेळी पदाधिकारी निवडताना अन्य अनेकजण इच्छुक होते. त्यांना वरिष्ठ नेत्यांना विश्‍वासात घेतले. पक्षासाठी, नेत्यांच्या शब्दासाठी सारे शांत राहिले. आता इतरांनाही संधी मिळायला हवी. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विचार करावा.'' 

विरोधकांची भीती कशाला? 
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सध्या महापालिका, जिल्हा परिषद किंवा अन्य स्थानिक संस्थांबाबत ज्यांना लोकांनी संधी दिली आहे, त्यांनी आपली टर्म पूर्ण करावी, असे जाहीर केले आहे. फोडाफोडी, पाडापाडीचे राजकारण करण्याचा जयंत पाटील यांचा इरादा नाही. वर्षभराच्या सत्तेसाठी ते तसा खेळ करणार नाहीत. त्यामुळे त्या भीतीने पदाधिकारी बदल टाळण्याचे काहीच कारण नाही, असा मुद्दादेखील पाटील आणि बालटे यांनी मांडला आहे.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give new people a chance, Dist. Change your shoulders ...