वाहतुकीबाबतच्या तक्रारी पाठविता येणार 'व्हॉट्‌सऍप'वर!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

सोलापूर - योग्य नियोजन केल्यास वाहतुकीच्या अनेक अडचणी सुटतील. मात्र, यासाठी सोलापूरकरांची साथ महत्त्वाची आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे. सोलापूरकरांना वाहतुकीविषयीच्या सूचना, तक्रारी "व्हॉट्‌सऍप'वर लवकरच पाठविता येतील, असे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

डॉ. अमृतकर यांच्या रूपाने पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेला तरुण आणि उत्साही अधिकारी दिला आहे. डॉ. अमृतकर यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानिमित्त "सकाळ'ने त्यांच्याशी संपर्क साधला. श्री. अमृतकर म्हणाले, "वाहनधारकांनी कायद्याचे, नियमांचे पालन केल्यास कोणत्याच अडचणी येत नाहीत. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असणे आवश्‍यक आहे. सध्या काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सोलापूरकरांच्या मदतीने आणखी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहर वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ कमी आहे. अधिक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा आवश्‍यक आहे. काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अयोग्य वागणूक मिळते. अशा वेळी इच्छा असूनही अनेकजण तक्रार करू शकत नाहीत. अनेकदा थोडासा बदल केल्यास वाहतुकीची कोंडी फोडता येते. याबाबतच्या सूचना, तक्रारी वाहतूक नियंत्रण शाखेच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर पाठविता याव्यात, अशी सुविधा नागरिकांना लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.

पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या संकल्पनेतून रिक्षाचालकांना गणवेश वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक रिक्षाचालकांनी गणवेश वापरण्यास सुरवात केली आहे. कारवाई करूनही रिक्षाचालकांमध्ये सुधारणा होत नसेल तर रिक्षाचे परमीट रद्द होण्याची कारवाई होऊ शकते. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत लवकरच सकारात्मक बदल दिसतील.

- डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा

Web Title: Give traffic complaints on WhatsApp