भोसेतील प्राचीन वटवृक्षाला जीवदान; पर्यावरण प्रेमी, ग्रामस्थांच्या आंदोलनास यश 

अजित कुलकर्णी 
Wednesday, 22 July 2020

'दैनिक सकाळ'ने हा प्रश्न सर्वप्रथम मांडला होता. त्याची दखल पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांनी घेऊन पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. या योगदानाबद्दलबद्दल 'सकाळ'चे अभिनंदन होत आहे. 

सांगली : भोसे ( ता. मिरज) येथील पुरातन वटवृक्ष प्रकरणी बुधवारी सकाळी महत्वपूर्ण तोडगा निघाला. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या दरम्यान येणाऱ्या या महाकाय झाडाला जीवदान मिळाले आहे. महामार्गाची रचना थोडीशी बदलून बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय नॅशनल हाय वे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) व दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. 'दैनिक सकाळ'ने हा प्रश्न सर्वप्रथम मांडला होता. त्याची दखल पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांनी घेऊन पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. या योगदानाबद्दलबद्दल 'सकाळ'चे अभिनंदन होत आहे. 

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मिरज-पंढरपूर मार्गावरील शेकडो झाडांची कत्तल झाली. भोसे (ता.मिरज) गावच्या हद्दीतील यल्लमा मंदिरासमोर सुमारे 400 वर्षांपासून उभा असलेला हा वटवृक्षही तोडला जाणार होता. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच कोकणातुन पंढरपूरकडे जाणारे हजारो वारकरी व दिंड्याचा मुक्काम येथे वटवृक्षाखाली असतो. तसेच वानर,पक्षी,प्राण्यांचा निवारा या झाडावर आहे. त्यामुळे हा पुरातन ठेवा असलेला वटवृक्ष तोडू नये, वाटल्यास रस्त्याची रचना बदलून काम व्हावे, अशी मागणी होती. 

मात्र ठेकेदाराने न जुमानता झाड तोडण्याची तयारीही केली होती. याबाबत दैनिक सकाळने 13 जुलैच्या अंकात छायाचित्र प्रसिद्ध करून हा ठेवा अखेरची घटका मोजत असल्याचे वास्तव समोर आणले होते. त्याची वस्तुस्थिती ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींना समजल्यावर लगेच आंदोलनही उभारले गेले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय गेल्यावर त्यांनी तात्काळ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला. अखेर काल श्री. गडकरी यांच्या कार्यालयातून भोसेच्या वटवृक्षप्रकरणी मार्ग काढण्याचे आदेश नॅशनल हाय वे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. 

त्यानुसार आज बुधवार (ता.23)रोजी सकाळी महामार्ग अधिकारी संजय कदम यंनी भेट देऊन पाहणी केली. सांगलीचे आर्किटेक्‍ट प्रमोद चौगुले यांनी झाड वाचवण्याबाबत पर्यायाची माहिती दिली. दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना करत महामार्गाचे डिझाइन थोड्या प्रमाणात बदलण्याचे फर्मान काढून वटवृक्षाला हात न लावण्याचे आदेश दिले.त्यामुळे रस्ता कामात बळी जाणारा मोठा पुरातन ठेवा आता अखंड राहण्यावर शिक्कामोर्तब झाले. यल्लमा मंदिर ट्रस्टचे शिवाजी कोळी, उपसरपंच मनोज पाटील, प्रवीण शिंदे, दिनेश कदम, राहुल गणेशवाडे यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थानी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. एकमेकांना साखर भरवत आनंदोत्सव साजरा केला. 

सकाळचा पुढाकार... 
महामार्ग कामात जाणाऱ्या या वटवृक्षाचे बोलके छायाचित्र 'सकाळ'ने प्रसिद्ध करताच निसर्गाचा हा ठेवा जपण्यासाठी अनेकजण पुढे आले. आंदोलनही झाले. मात्र, ठेकेदार कंपनीने प्रशासन व पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेवत या वटवृक्षाची शिकार करण्याचा बेत आखला. वटवृक्ष परिसरात आंदोलन तसेच एकत्र येण्यास पोलिसांनी मज्जाव केला.पर्यावरणप्रेमी, वारकरी मंडळींचे होणारे आंदोलन दडपून टाकण्यात येत असल्याचे समोर आणले होते. सुरवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत "सकाळ'ने एक प्राचीन वटवृक्ष वाचवण्यात पुढाकार घेतला. त्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Giving life to the tree in Bhose; Environmentalists, success of the villagers' movement