
सांगली-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनाचा पडदा नाट्यपंढरी सांगलीत 27 मार्च रोजी उघडला जाणार आहे. संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. 26 ते 29 मार्चअखेर नाटक, बालनाट्य, एकांकिकासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ""शंभराव्या नाट्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. तंजावर येथे जतन केलेल्या नाट्यसंहिताचे 25 मार्च रोजी नमन केल्यानंतर शंभराव्या संमेलनाचा प्रवास सुरू होईल. 26 मार्च रोजी नाट्यसंमेलनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील कलाकारांचे नाटक होईल. 27 रोजी सकाळी नाट्यकर्मी आणि रसिकांच्या उपस्थितीत दिंडी निघेल. 27 रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. स्वागताध्यक्ष म्हणून खासदार तथा नाट्यपरिषदेचे विश्वस्त शरद पवार, उद्घाटक लेखिका सई परांजपे, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, 99 व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि प्रमुख निमंत्रक पालकमंत्री जयंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाची जागा लवकरच निश्चित केली जाईल.''
ते पुढे म्हणाले, ""27 मार्चला उद्घाटनाच्या दिवशी सतिश आळेकर दिग्दर्शित सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. 26 ते 28 अखेर स्थानिक कलाकार आणि नाट्य परिषद शाखांतील रंगकर्मींच्यावतीने चर्चा, परिसंवाद, नाटक, बालनाट्य, एकांकिका आणि सेलिब्रिटींची कलाकार रजनी होईल. 29 रोजी राज्यातील विविध कलाकारांचे कार्यक्रम दिवसभर भावे नाट्यमंदिरात होईल. तसेच या काळात जत, पलूस, शिराळा, विटा येथे नाट्यप्रयोग सादर होतील. सांगलीतील नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनानंतर 30 मार्चपासून नाट्यजागर सुरूच राहील. कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड अशा सर्व 11 शाखांच्या ठिकाणी विविध कार्यक्रम होतील. 14 जून रोजी नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या पुण्यतिथीदिनी मुंबईत संमेलनाचा समारोप होईल.''
नाट्य परिषद मध्यवर्ती समितीचे कार्यकारिणी सदस्य आणि प्रवक्ते मंगेश कदम, सह कार्यवाह सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य दिगंबर प्रभू, शाखा सांगलीचे अध्यक्ष श्रीनिवास जरंडीकर, मुकुंद पटवर्धन, संदीप पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
नाट्यसंमेलनाचा सहाव्यांदा बहुमान-
नाट्यपंढरी सांगलीत यापूर्वी पाच नाट्यसंमेलने झाली आहेत. शंभराव्या नाट्यसंमेलनाचा मान नाट्यपंढरीला मिळाला आहे. तयारीची लगबग सुरू झाली आहे. कलाकार आणि नाट्यरसिकांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. प्राथमिक बैठक होऊन विविध समित्यांची रूपरेषा तयार झाली आहे. संमेलन थाटात पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या 22 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.