बांधावर जाऊन तत्काळ पंचनामे करा : पालकमंत्री जयंत पाटील; कोणालाही वंचित ठेवू नका 

विष्णू मोहिते
Sunday, 18 October 2020

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतिपिकांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावा. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दिले.

सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतिपिकांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावा. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सर्वश्री सुरेश खाडे, अनिल बाबर, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, झेडपीचे सीईओ जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे काही घरांची अंशत: अथवा पूर्णता पडझड झाली आहे त्यांचे पंचनामेही तत्काळ करावेत. मयत व्यक्ती व मृत जनावरे याबाबत मदत मिळण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करावी. सामान्य वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खचलेले रस्ते, पूल आदिबाबत जी लहान स्वरूपाची कामे आहेत त्याची तत्काळ दुरूस्ती सुरू करावी. जी मोठी कामे आहेत त्याला निधी मागणीसाठी सर्व्हे करून प्रस्ताव सादर करावेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विमा कंपन्यानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे त्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती विहीत वेळेत विमा कंपन्यांना द्यावी. यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती विमा कंपन्यांना सादर करण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करावी. यापासून कोणीही शेतकरी माहिती न दिल्यामुळे वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. महावितरणने ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला आहे तो आवश्‍यक दुरूस्ती करून तत्काळ सुरू करावा. 

अतिवृष्टीमुळे नुकसान 

  • बाधित गावे-123 
  • मृत्यू 9 व्यक्ती 
  • पशू- 28 व पक्षी 2800, 
  • घराची पडझड- 804 
  • शेतीचे 8 हजार 276 हेक्‍टर नुकसान 

संपादन : युवराज यादव


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: Go to the Fields and get immediate panchnama: Guardian Minister Jayant Patil; Don’t deprive anyone