नुकसानीच्या जागेवर जाऊन प्रामाणिकपणे पंचनामे करा

बलराज पवार
Tuesday, 20 October 2020

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या बिसुर, खोतवाडी आणि नांद्रे गावाला भेटी देऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी नुकसान झालेल्या पिकांची, घरांची, रस्त्यांची पाहणी केली.

सांगली : अवकाळी पावसाने फटका बसलेल्या बिसुर, खोतवाडी आणि नांद्रे गावाला भेटी देऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी नुकसान झालेल्या पिकांची, घरांची, रस्त्यांची पाहणी केली. या नुकसानीच्या जागेवर जाऊन प्रामाणिकपणे पंचनामे करावेत आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करावा असे आदेश त्यांनी सांगलीच्या अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना दिले. 

शहर आणि जिल्ह्याला या अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हजारो हेक्‍टरवरील शेतीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी  नांद्रे, बिसूर, खोतवाडी या गावांना भेटी देऊन पाहणी केली. उध्वस्त झालेली पिके, घरे, रस्ते तसेच नुकसान झालेल्या पुलांची पाहणी केली. स्थानिक शेतकऱ्यांशी, ग्रामसेवकांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली. 

आमदार गाडगीळ म्हणाले, राज्य शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने रोख अनुदान द्यावे अशी मागणी आपण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या वर्षी महापुरावेळी युती शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ रोख अनुदान देऊन मदत केली होती. तशीच मदत राज्यातील सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांना करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, पंचायत समिती माजी उपसभापती विक्रम पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती राहुल सकळे, संतोष पाटील, सतीश पाटील, विठ्ठल मुळीक, रामचंद्र भोसले, खोतवाडी सरपंच संजय सूर्यवंशी, दिंगबर कदम, सरपंच लीलावती पाटील, उपसरपंच रामचंद्र पाटील, विजू गोसावी, किसन पाटील, पंडित पाटील तसेच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Go to the place of loss and make honest inquiries