गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टिव्हीटी वाढविण्याची गरज - मुख्यमंत्री सावंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री सावंत यांचे कोल्हापुरातील वर्गमित्र डॉ. रणजित सावंत उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मुद्द्यांवर मते मांडली. एअरपोर्ट कनेक्‍टिव्हिटी, पायाभूत सुविधांचा विकास, दीर्घकालीन औद्योगिक धोरण याची त्यांनी मांडणी केली. जिल्ह्याच्या औद्योगिक धोरणाविषयी ते म्हणाले, ‘‘कोल्हापुरात सुपीक जमीन, मुबलक पाणी यामुळे कृषी उत्पादने चांगली आहेत. त्या दृष्टिकोनातून विचार करून पायाभूत सुविधांचा विकास केला तर इथे कृषिपूरक उद्योग उभे राहतील. ’’

कोल्हापूरच्या आठवणींबद्दल सावंत म्हणाले, ‘‘मी शिक्षणासाठी पाच वर्षे कोल्हापुरात राहिलो. महाविद्यालयात शेवटच्या वर्षात बिनविरोध जीएस बनलो. निरोप समारंभावेळी मला आमदार व्हायचे आहे, अशी त्या वेळी इच्छा व्यक्त केली होती. मनोहर पर्रीकरांमुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलो. आमदार बनलो. आता मुख्यमंत्री आहे. तुम्ही जनतेची सेवा केली की लोक तुम्हाला स्वीकारतात.’’

या वेळी निवासी संपादक निखिल पंडितराव, मुख्य बातमीदार सुधाकर काशीद उपस्थित होते. 

गोवा बनणार मेडिकल टुरिझम हब
गोव्यातील पर्यटनाबद्दल डॉ. सावंत म्हणाले, ‘‘गोव्यात निसर्ग, प्राचीन मंदिरे, चर्च, समुद्र पाहण्यासाठी लोक येतात. त्यामुळे तेथील पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. आता आम्ही तेथे मेडिकल टुरिझम विकसित करीत आहोत. यामुळे जगभरातून लोक उपचारांसाठी गोव्यात येतील.’’

‘सुशेगाद’ आणि निवांत
गोव्यातील लोक ‘सुशेगाद’ असे म्हणतात; तर कोल्हापुरातील लोक ‘निवांत’ म्हणतात. उद्याची चिंता करण्यात आजचा दिवस काळजीत घालवू नका. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. हीच दोन्ही ठिकाणची जीवनशैली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa Chief Minister Pramod Sawant visit to Sakal Kolhapur office