अबब ! बोकडाचे मटण 520 रुपये किलो 

Goat Mutton at Rs 520 per KG in Sangli District
Goat Mutton at Rs 520 per KG in Sangli District

सोन्याळ (सांगली)  - बोकड्याच्या कातड्याची विक्री होत नसल्याने मटणाचा व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसायात फायदा पडत नसल्याने बोकडाच्या मटणाच्या दरात तब्बल 40 रुपयांची वाढ केल्याने मटणाचा दर किलोला 520 रुपये झाला आहे. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या खवय्यांची पंचाईत झाली आहे. नाईलाजाने त्यांचा ओढा बॉयलर चिकनकडे वाढला आहे. मटणाचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्याने खवय्यांना दुधाची तहान ताकावर भागावण्याची वेळ आली आहे. 

मटण तोडण्याचा धंदा परवडत नसल्याचे कारण सांगून मटण व्यावसायिकांनी गेल्या दोन वर्षांपासून सलग किलोमागे 40 रुपये मटणाचा दर वाढवला आहे. दसऱ्याच्या अगोदर मटणाचा दर 480 रुपये किलो होता. आता त्यात आणखी 40 रुपयाने वाढ केल्याने मटणाचा दर 520 रुपये झाला आहे. त्यामुळे मटणावर ताव मारणाऱ्या खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे. मटणाचा दर भडकला असताना बॉयलर कोंबडीच्या चिकनचा दर मात्र 160 रुपये किलोच्या आसपास असल्याने खवय्यांचा ओढा आता चिकनकडे वाढला आहे. मटणाचे दर वाढल्याने खवय्यांना आपल्या आवडीला आवर घालावा तर लागलाच आहे, पण घरी पाहुणे म्हणून आलेल्या लोकांना आता चिकनचा रस्सा खाऊ घातला जात आहे. 

मटण व्यावसायिक आठ ते नऊ किलो वजनाचे बोकड कापत असतात. याचे मटण रुचकर लागते. बोकडाचे वय वाढेल तसे त्याच्या मटणाला एक प्रकारचा वास यायला लागतो. तसेच मटण शिजायलाही वेळ लागतो. त्यामुळे ग्राहक असे मटण स्वीकारत नाहीत. साहजिकच मटण व्यवसाय करणाऱ्यांना साधारण आठ - नऊ किलो दरम्यान वजन असलेली बोकडे कापावी लागतात. नाहीतर गिऱ्हाईक येत नाहीत, असे एका विक्रेत्याने सांगितले.

जीएसटीसह अन्य कारणांमुळे मंदी

विक्रेता म्हणाला की, कातडी घेणाऱ्या कंपन्या कातडी घेत नसल्याने व्यापाऱ्यांनीही माल घ्यायचा बंद केला आहे. जीएसटी व अन्य कारणाने या धंद्यात मंदी आली आहे, ती कायमच राहिली आहे. त्यामुळे पूर्वी 100 ते 150 रुपयांना विकली जाणारी कातडी आज व्यापारी 20 रुपयांना सुद्धा घेत नाहीत. शेवटी कातडी फेकून द्यावी लागत आहेत. मटण व्यवसाय करणे आता आर्थिकदृष्ट्‌या परवडत नाही. साहजिकच मटणाचे दर वाढवावे लागत आहेत. 

बोकडांचा तुटवडा 

सध्या बोकडांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. मागील खेपेला मोठा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विकून टाकली होती. त्यातच आंध्रप्रदेश मधील व्यापारी येऊन बोकडांची खरेदी करत असल्याने बोकडांची पिल्ली मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे धंदा कमी झाला आहे,असेही मटण विक्रेत्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com