esakal | शेळ्या-मेंढ्यांनाही मिळाला "ही' सवलत
sakal

बोलून बातमी शोधा

corona

लॉकडाउनमुळे रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या खंडाळा तालुक्‍यातील विविध गावांतील मेढपाळांच्या शेळ्या व मेंढ्याना परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रवासाची परवानगी मिळाली आहे. 

शेळ्या-मेंढ्यांनाही मिळाला "ही' सवलत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणंद (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या खंडाळा तालुक्‍यातील मेंढपाळांना आपल्या मेंढ्या (बकरी) ट्रक आणि टेंपोद्वारे पुन्हा घरी आणण्याची रीतसर परवानगी रायगड व सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकतीच मिळाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील अंदोरी, वाघोशी, कराडवाडी, खेड बुद्रुक येथील 20 मेंढपाळांना आपल्या आठ ते नऊ हजार शेळ्या, मेंढ्या घरी घेऊन येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

खंडाळा तालुक्‍यात मेंढपाळांची संख्या मोठी आहे. हा तालुका पूर्वीपासूनच दुष्काळी पट्ट्यात येत असल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या चारा-पाण्याची आबाळ होऊ नये, यासाठी येथील बहुतांश मेंढपाळ दिवाळीनंतर आपल्या शेळ्या-मेंढ्या व बिऱ्हाड (कुटुंब) घेऊन कोकणची वाट धरतात आणि पावसाळ्यापूर्वी एप्रिल- मेमध्ये पुन्हा आपल्या गावी परतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे हे सर्व मेंढपाळ कोकणातच अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, पेण, महाड येथे अडकून पडलेल्या खंडाळा तालुक्‍यातील विविध गावांतील मेंढपाळांना घरी परतणे अवघड झाले होते. तेथे उन्हाळा सुरू झाल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नासह कुटुंबाच्या उदरनिर्वाहचीही अडचण झाली होती. जनावरांची उपासमार सुरू आहे. 

दरम्यान, वाघोशी (ता. खंडाळा) येथील युवक कार्यकर्ते किसन धायगुडे यांनी सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री. शिंदे यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून व पत्रव्यवहार करून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. मंत्री केदार यांनी तातडीने रायगड व साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोकणात लॉकडाउनमध्ये अडकलेल्या या मेंढपाळांबाबत त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर सातारा व रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ दोनच दिवसांमध्ये वाहनांतून मेंढ्या घरी आणण्यास रीतसर परवानगी दिली आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्‍यातील या मेंढपाळांचा जीव भांड्यात पडला आहे. 

आठ ते नऊ हजार शेळ्या-मेंढ्या वाहनाने येणार 
कोकणातून शेळ्या-मेंढ्या आणण्यासाठी कराडवाडीच्या तीन, अंदोरीतील दोन, खेड बुद्रुकच्या दोन व वाघोशीतील 13 आशा एकूण 20 मेंढपाळांना आठ ते नऊ हजार शेळ्या-मेंढ्या वाहनांतून आणण्याची रीतसर परवानगी मिळाली आहे. मात्र, अद्यापही तालुक्‍यातील अन्य गावांतील अनेक मेंढपाळ कोकणात अडकून पडले असण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
 

हुशश ! महाबळेश्वर आजही काेराेनामुक्तच; कैदी सुरक्षित स्थळी नेले 

loading image