मंदीच्या वातावरणातही सोने-चांदी दरात वाढ सुरूच

घनश्‍याम नवाथे 
Friday, 7 August 2020

"लॉकडाउन' काळात अनेक ठिकाणी मंदीचे वातावरण असले तरी सोने-चांदी दरात वाढ सुरूच आहे. सोने दर प्रति दहा ग्रॅम 56 हजार रूपये तर चांदीचा किलोचा दर 73 हजार 500 रूपयेपर्यंत गेला आहे.

सांगली : "लॉकडाउन' काळात अनेक ठिकाणी मंदीचे वातावरण असले तरी सोने-चांदी दरात वाढ सुरूच आहे. सोने दर प्रति दहा ग्रॅम 56 हजार रूपये तर चांदीचा किलोचा दर 73 हजार 500 रूपयेपर्यंत गेला आहे. सध्या गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. यामुळे तसेच जागतिक बदल व देशांतर्गत कारणातून सोने-चांदी दरात वाढ होऊ लागल्याचे सांगितले जाते. 

लॉकडाऊन काळात सोने दरात तब्बल अकरा हजार रूपयांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत सध्या मंदीचे वातावरण आहे. तसेच देशांतर्गत वाहतूकीवर मर्यादा आल्या आहेत. खाणीतून नविन सोने निर्मिती सध्या बंदच आहे. बॅंकातील ठेवीचे दर घसरले आहेत. सध्या गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून सोने आणि चांदी दरात वाढ होऊ लागली आहे. लॉकडाउनच्या काळातच सोने दराने पन्नास हजाराचा म्हणजेच सुवर्ण टप्पा ओलांडला आहे. तेवढ्यावर दर स्थिर नसून गेल्या काही दिवसात दर वाढतच चालले आहेत. आजचा सोन्याचा दर जीएसटी शिवाय 56 हजार रूपये प्रतितोळा इतका होता. तर चांदीचा दर जीएसटी शिवाय 73 हजार 500 रूपये इतका होता. 

लॉकडाउनमुळे सध्या अनेकांचा रोजगार गेला आहे. उद्योग धंद्यामध्ये मंदीचे वातावरण आहे. लॉकडाउनमध्ये अनेकजण सोने देवघेवीपेक्षा साधेपणाने लग्नसोहळा साजरा करत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असली तरी सोने दरात दुसरीकडे वाढच होत आहे. सामान्यासाठी सोने म्हणजे सोनेरी स्वप्नच ठरले आहे. सोने दरवाढीमुळे सामान्य व मध्यमवर्गीयांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम म्हणून सराफ पेठेतील छोट्या दुकानात खरेदीसाठी नेहमीसारखी गर्दी दिसून येत नाही. तर मोठ्या पेढ्यामध्ये मात्र ग्राहक दिसत आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold and silver prices continue to rise despite the recession