esakal | अबब ! सोने वर्षात 11 हजारांनी वाढले; तरीही दसरा-दिवाळीसाठी बाजार सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Gold increased by 11,000 in the year; Still the market ready for Dussehra-Diwali

गेल्यावर्षी दसऱ्याच्या सणादिवशी असलेला प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर यंदा तब्बल 11 हजार रुपयांनी वाढला आहे. पुढील वर्षीच्या लग्नसराईची खरेदी या दोन मुहूर्तावरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अबब ! सोने वर्षात 11 हजारांनी वाढले; तरीही दसरा-दिवाळीसाठी बाजार सज्ज

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः लग्नसराईचे प्रमुख चार महिने कोरोना लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर सुवर्ण बाजार आता दसरा आणि दिवाळीच्या महाखरेदी धमाक्‍यासाठी सज्ज झाला आहे. अचानक सोने-चांदी दरात ऑगस्टमध्ये आलेली उसळी आणि आता स्थिरावलेले दर पाहता ग्राहक बिनधास्तपणे खरेदीला सरसावतील, असा विश्‍वास या पेठेतून व्यक्त होतोय. पुढील वर्षीच्या लग्नसराईची खरेदी या दोन मुहूर्तावरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी दसऱ्याच्या सणादिवशी असलेला प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर यंदा तब्बल 11 हजार रुपयांनी वाढला आहे. 

"यंदा दिवाळीला सोने 70 हजार होईल', या बातमीने गेल्या महिनाभरात चर्चेला उधाण आले होते. कारणही तसेच होते. लॉकडाऊन सुरू होताना मार्चमध्ये 44 हजार रुपयांवर असलेले सोने ऑगस्टमध्ये थेट 55 हजारांवर पोचले होते. ते वाढता वाढता वाढे, असेच राहील, असा अंदाज होता. अर्थात, तो चुकीचा ठरला आणि सोने 50 हजार रुपयांवर येऊन स्थिरावले आहे. अभ्यासकांच्या मतानुसार, दसरा दिवाळीला फार वाढ होण्याची शक्‍यता नाही. परंतु, भविष्यात झपाट्याने वाढ झाल्यास आश्‍चर्य नको. त्यामुळे पुढील सराईत लग्न सोहळे निश्‍चित झालेले लोक साडेतीन मुहूर्तांपैकी दोन महिन्याचे मुहूर्त साधतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊन काळात बसलेला फटका मोठा होता. लग्नसराईचे चार महिने वाया गेले. त्यानंतरही उलाढाल स्थिर व्हायला बराच काळ गेला. आता तो स्थिर होण्याच्या टप्प्यावर असल्याने सराफ पेठेतून मंदीचे वारे हटण्याची चिन्हे वाढली आहेत. 

अधिक मासाने हात दिला 
लॉकडाऊन काळात अत्यंत साधेपणाने लग्न सोहळे उरकले गेले. या नव्या जावईबापूंना सासरवाडीकडून अधिक मासाचे वाण भरभरून दिले गेले. त्यामुळे यंदाचा अधिक महिना चांगली उलाढाल करणारा ठरला. पीएनजीचे संचालक गणेश गाडगीळ यांच्या निरीक्षणानुसार, यंदा अधिक मासात चांदीच नव्हे, तर सोन्याचीही मोठी उलाढाल झाली. 

उद्यापेक्षा आज स्वस्त अशी स्थिती

सोने आणि चांदीचा दर हा उद्यापेक्षा आज स्वस्त अशी स्थिती नेहमीच राहिली आहे. त्यामुळे दर वाढला म्हणून खरेदी थांबली, असे होत नाही. कारण, लग्न किंवा अन्य कारणाने खरेदी लांबणीवर टाकून दर कमी होणार नाही, हे लोक जाणतात. त्यामुळे यंदा दसरा आणि दिवाळीला मोठी उलाढाल होईल, असा विश्‍वास आम्हाला आहे. 
- गणेश गाडगीळ, संचालक, पीएनजी, सांगली 

वर्षभरातील सोन्या-चांदीचे दर 

महिना सोने (10 ग्रॅम चांदी (किलो) 
ऑक्‍टोबर 2019 38,880  48,950 
नोव्हेंबर 2019 38,990 48,840 
डिसेंबर 2019 38,950  49,350 
जानेवारी 2020 41,150  51,000
 फेब्रुवारी 2020 43,000  51,500 
 मार्च 2020  44,320 51,080 
एप्रिल  2020 47,150 42,700 
मे 2020 47600  50,110 
जून 2020 48,410 50,160 
जुलै 2020 52,900 66,050 
ऑगस्ट 2020  55,400 76,510
सप्टेंबर 2020 51,750 69,500 
ऑक्‍टोबर 2020 50120 63,800 

संपादन : युवराज यादव

loading image