esakal | सोन्‍याचा आलेख पुन्हा चढला; दरामध्ये हजारोंची वाढ

बोलून बातमी शोधा

null

सोन्‍याचा आलेख पुन्हा चढला; दरामध्ये हजारोंची वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना आटोक्‍यात येत असताना सोने दराचा आलेख खाली आला होता. धक्कादायक पद्धतीने हा दर ५५ हजारांवरून ४५ हजारांवर येऊन स्थिरावला होता. आता पुन्हा कोरोना संकट आले आहे. लॉकडाउन नाही; मात्र कडक निर्बंधांत सराफ पेठा पूर्ण बंद आहेत. त्यातच सोने दराचा आलेख पुन्हा वरती चढू लागला आहे. दरात सुमारे अडीच ते तीन हजारांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर जवळपास ४८ हजारांच्या घरात गेला आहे.

दरम्यान, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ पेठा पूर्णपणे बंद आहेत. काही दिवस अपवादात्मक स्थितीत सराफी पेढ्यांनी मागील दाराने व्यवहार केला; मात्र आता परिस्थिती अधिक गंभीर आहे. पोलिस यंत्रणा दक्ष आहे. एकाने असा प्रकार केला, तर लगेच तक्रारी होत आहेत. शिवाय, लोकांना आता बाहेर फिरण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी, तातडीने सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचे असल्यास कर्नाटक पेठांचा पर्याय समोर आला आहे.

बेळगाव, अथणी, जमखंडी आदी ठिकाणी सोने खरेदीचा पर्याय सुचवला जात आहे. ज्यांना लग्नसमारंभ उरकायचे आहेत, त्यांनी कर्नाटकचा रस्ता धरला आहे. जागतिक बाजारात सोने दराने गेल्या वर्षी उच्चांक गाठला होता. त्या मागे कोरोनामुळे जगात निर्माण झालेली गुंतवणूक क्षेत्रातील स्थिती कारणीभूत होती. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर ती स्थिती बदलली आणि सोन्याचे दरही खाली आले. तेही ४५ हजार रुपयांपर्यंत. त्यामुळे त्यावेळी सोने आणखी नवा उच्चांक गाठेल या अंदाजावर गुंतवणुकीसाठी पुढे आले होते, त्यांची निराशा झाली. तीच स्थिती आता झाली आहे. दर आणखी कमी होतील, असा अंदाज बाळगून प्रतीक्षा करणाऱ्यांना झटका बसला आहे. त्यातच पेठा बंद असल्याने खरेदीचा विषयही थांबला आहे.