राजकारणातील सोनेरी टोळ्यांमुळे देशाला धोका : अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

""जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली. हे केवळ जळगाव प्रकरण समजू नका. सुरेश जैन किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरण समजू नका. या देशात राजकारणातून ज्या सोनेरी टोळ्या निर्माण होत आहेत, त्यापासून देशाला गंभीर धोका आहे. या प्रकरणाच्या निकालामुळे अशा टोळ्यांना जरब बसेल,'' असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

नगर : ""जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली. हे केवळ जळगाव प्रकरण समजू नका. सुरेश जैन किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरण समजू नका. या देशात राजकारणातून ज्या सोनेरी टोळ्या निर्माण होत आहेत, त्यापासून देशाला गंभीर धोका आहे. या प्रकरणाच्या निकालामुळे अशा टोळ्यांना जरब बसेल,'' असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

जळगाव येथील घरकुल गैरव्यवहार खटल्यात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह 48 जणांना शिक्षा झाली. त्या गुन्ह्याचा सखोल तपास केल्याबद्दल हजारे यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.

या वेळी हजारे म्हणाले, ""ईशू सिंधू यांनी जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा तपास काटेरी कुंपणात राहून केला, म्हणून त्यांना गुलाबाचे पुष्प देऊन अभिनंदन केले. हे प्रकरण 1999 मधील आहे. आमच्या तक्रारीनंतर न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील समितीने चौकशी केल्यानंतर त्यातील सर्व जण दोषी आढळले. मात्र, त्या वेळच्या सरकारने त्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यापुढे काहीच झाले नाही. त्या प्रकरणाचे गुन्हेही कोणी दाखल करीत नव्हते. ते काम तत्कालीन आयुक्त गेडाम यांनी केले.''

हजारे म्हणाले, ""गुन्हा दाखल केल्याने सिंधू यांना रस्ता मिळाला. या गुन्ह्याचा तपास करण्याचे धाडस पहिल्यांदा ईशू सिंधू यांनी केले. भक्कम पुरावे गोळा केले. अटक केलेले आरोपी सुटणार नाहीत याचीही काळजी घेतली. त्यामुळे साडेतीन वर्षे आरोपी कारागृहात राहिले. सिंधू यांनी मरण हातावर घेऊन हा तपास केला. मरण हातावर घेतलेला माणूस मरणाला भीत नाही. त्या काळात त्यांच्या कुटुंबीयांनाही त्रास झाला; मात्र ते डगमगले नाहीत. विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली.''

""देशातील हे पहिले प्रकरण आहे, की आरोपींना शंभर कोटी रुपयांचा दंड, सात वर्षांची शिक्षा झाली. यापूर्वी असे कोठेही घडले नव्हते. केवळ चौकशीच्या आधारे हा खटला उभा राहिला. या प्रकरणाच्या मागे मर्यादित दृष्टिकोन नाही. सामाजिक, राजकीय दृष्टिकोन फार मोठा आहे,'' असेही हजारे म्हणाले.

सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर तपासासाठी ईशू सिंधू यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यास सर्व काही बाहेर येईल.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: golden gangs of politics will be dangerous for country, says Anna Hazare