सोने दराचा सुवर्णमहोत्सव : 50 वर्षे; 50 हजार रुपयांची वाढ

अजित झळके
Tuesday, 3 November 2020

गेल्या 50 वर्षांत सोन्याचा दरात 50 हजार रुपयांची वाढ झालीय, एका अर्थाने हा सोने दराचा सुवर्णमहोत्सवच आहे. बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1970 साली सोन्याचा दर 184 रुपये होता. 

सांगली  साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर यंदा रेकॉर्डब्रेक सोने खरेदीचा अंदाज आहे. सोने दरातील सातत्यपूर्ण वाढ आणि गेल्या सहा महिन्यांत कोरोनामुळे थांबलेली लग्नकार्ये या कारणाने उलाढाल वाढीची शक्‍यता वर्तवली जातेय. यावर्षीच सोन्याच्या दराने प्रति 10 ग्रॅम (एक तोळा) 50 हजारांचा टप्पा गाठला. गेल्या 50 वर्षांत सोन्याचा दरात 50 हजार रुपयांची वाढ झालीय, एका अर्थाने हा सोने दराचा सुवर्णमहोत्सवच आहे. बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1970 साली सोन्याचा दर 184 रुपये होता. 

कोरोना संकटाने 24 मार्चला लॉकडाऊन सुरू झाले आणि दोन महिन्यानंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. या काळात लग्नकार्ये थांबली. मोठे सोहळे झाले नाहीत. हे सगळे सोहळे आता दिवाळीनंतर होतील. त्यामुळे दिवाळीच्या मुहुर्तावर यंदा सोने खरेदीचा धूमधडाका असेल, असा कयास आहे. अर्थात, सोन्याचा दर वाढता वाढता वाढे, असाच राहिला आहे. त्यामुळे "सोने उद्यापेक्षा आज स्वस्त' हे वास्तव आहे. गेल्या पन्नास वर्षांतील सोने दराचा आलेख पाहिला, तर ते स्पष्टच होते. सन 1970 साली म्हणजे बरोबर पन्नास वर्षापूर्वी सोन्याचा त्या वर्षातील उच्चांकी दर 184 रुपये प्रतितोळा होता. एक हजार रुपयांत पाच तोळे सोने आणि त्याची मजुरीही बसायची. 
यावर्षी सोने दराने अनेक हेलकावे खाल्ले. ऐन लॉकडाऊन काळात अनपेक्षितपणे सोने दराने 55 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. मधेच हूल उठली, दिवाळीला सोन्याचा दर 70 हजारांवर जाणार. त्यामुळे काही जणांनी अनलॉक सुरू होताच घाईघाईने सोने खरेदी केली आणि काही दिवसांतच सोने दराने पाच हजार रुपयांनी गटांगळी खाल्ली. तो 50 हजारांच्या आत आला. आता पुन्हा तो 51 ते 52 हजारांवर स्थिरावला आहे. बाजारात कितीही चढउतार झाला तरी महिलांची सोने खरेदीची हौस आणि ओढ किंचितही कमी झालेली नाही. दर कितीही वाढो, पै अन्‌ पै साठवून थोडेथोडे सोने गाठीला बांधण्याची परंपरा राहिली आहे. ती पन्नास वर्षांपूर्वीही होती आणि आजही आहे. 

यंदाची वाढ उच्चांकी 
सोने दरात दरवर्षी वाढ होतच आली आहे. पन्नास वर्षांची सरासरी पाहता, दरवर्षी एक हजार रुपयाने दरवाढ दिसते आहे. पण सन 2019 ते 2020 या दिवाळी काळातील दराचे अंतर पाहता ते उच्चांकी आहे. यावर्षी तब्बल 15 हजार रुपयांहून अधिक दरवाढ झाली आहे. मध्यंतरी ती 20 हजारांच्या घरात गेली होती, पुन्हा दर उतरले. 

दर वाढले अन्‌ घसरलेही 
सोने दरात दरवर्षी वाढ दिसतेच आहे, मात्र अनेकदा अचानक मोठी दरवाढ झाली आणि पुन्हा ती मूळ पदावर येऊन स्थिरावले, असेही अनेकदा झाले आहे. 1976 साली 545 रुपये असलेला दर 1977 मध्ये 486 झाला. 1981 ला 1800 वरून 1982 मध्ये 1600 झाला. 1992 मध्ये 4300 रुपयांवरून 1993 साली 4000 रुपये झाला. 1996 मध्ये 5100 वरून 1997 साली 4700; तर 1998 ला 4000 झाला. 2000 मध्ये तो 4400 होता, तर 2001 साली 4300 झाला. 2012 साली 32 हजारांवरून 29,600 वर आला. 2014 ला 28,000 वरून पुढच्या वर्षी 26,343 वर उतरला. 

सोन्याचे दर का वाढताहेत? 

गेल्या पन्नास वर्षातील सोन्याची दराची वाढ ही एका निश्‍चित वेगाने झाली, मात्र यावर्षी ती अचानक का वाढली? त्यावर अभ्यासकांनी केलेल्या संशोधनानुसार, मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर गुंतवणूकदारांना अन्य क्षेत्रातील गुंतवणूक ही धोकादायक आणि तुलनेत कमी परताना देणारी वाटू लागली आणि सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित. सहाजिकच, सोने खरेदीकडे ओढा वाढणार हे स्पष्ट झाले आणि तेथूनच दरातील वाढीने वेग पकडला. पुढील दोन वर्षात हा वेग असाच राहू शकतो, असाही अंदाज आहे. छोट्या सोने खरेदीदारांचा ठेवीवरील व्याजाचे दर खाली आल्याच्या पार्श्‍वभूमीवर सोने खरेदीकडे कल वाढेल, असाही एक अंदाज आहे. 

पाच तोळे सोने घेतले होते...

30 मे 1970 रोजी माझे लग्न झाले. त्यावेळी आम्ही पाच तोळे सोने घेतले होते. मजुरीसह 200 रुपयांपेक्षा कमीच खर्च झाले. एक हजार रुपयांत सोने आले आणि पैसेही वाचले होते. लग्नाला पन्नास वर्षे झाली आणि सोन्याचा दरही पन्नास हजार झाला. 
- शिवाजीराव शिरदवाडे, एरंडोली 

1970 पासूनची सोने दरातील वाढ

वर्ष (रु. प्रति 10 ग्रॅम) 
1970 184 
1975 520 
1980 1300
1985 2000 
1990 3200 
1995 4650 
2000 4400 
2005 7000
2010 18000 
2015 26,343 
2020 51,500 (आजचा) 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden Jubilee of Gold rate : increase of Rs 50,000 in 50 years