esakal | कोरोनात गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात पावणेदोन लाख बेरोजगारांना नोकरीची संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs Opportunity In Satara District Inceased

लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील सुमारे लाख ते दीड लाख कामगार उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यांत निघून गेले आहेत. आता लॉकडाउन शिथिल झाल्यावर हे कामगार परत येतील का, याची शाश्‍वती नाही.  त्यामुळे आपल्याकडे कामगार व कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे.

कोरोनात गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात पावणेदोन लाख बेरोजगारांना नोकरीची संधी 

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेले लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर उद्योग, व्यवसाय सुरू झाले. परंतु, त्यांना सध्या कामगारांची समस्या जाणवत आहे.
पण, जिल्ह्यात एक लाख 77 हजार सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. या युवकांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातच रोजगाराची
संधी उपलब्ध झाली आहे. उद्योजकांनी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या या सुशिक्षित बेरोजगारांना संधी देऊन त्यांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यातच काम मिळाल्यास त्यांना पुणे, मुंबईची वाट धरावी लागणार नाही. 

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. पण, लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील सुमारे लाख ते दीड लाख कामगार उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यांत निघून गेले आहेत. आता लॉकडाउन शिथिल झाल्यावर हे कामगार परत येतील का, याची शाश्‍वती नाही.  त्यामुळे आपल्याकडे कामगार व
कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे.

मात्र, यानिमित्ताने स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी जिल्ह्यातच उपलब्ध झाल्या आहेत. काहीही अनुभव नसला तरी चालेल; पण कामगार व कर्मचारी द्या, अशी अपेक्षा उद्योजक करू लागले आहेत. अशावेळी जिल्ह्यात सेवायोजन कार्यालयात नोकरीसाठी नोंदणी केलेले तब्बल एक लाख 77 हजार 90 युवक- युवतींना या निमित्ताने नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता त्यांनी पण तू, परंतु करण्याऐवजी आलेल्या संधीचा फायदा उठवत नोकरी मिळवत आर्थिक अडचणीचा सामना करणे गरजेचे आहे.

या पावणेदोन लाख नोंदणी केलेल्यांमध्ये एक लाख 29 हजार 444 पुरुष व 47
हजार 624 स्त्रियांचा समावेश आहे. सर्वाधिक नोंदणी सातारा तालुक्‍यातून 41 हजार 258 इतकी झाली असून, यामध्ये 28 हजार 599 युवक, 12 हजार 659
युवतींची संख्या आहे. सर्वांत कमी नोंदणी जावळी व महाबळेश्‍वर तालुक्‍यांतून आहे. कारण येथील बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार हे मुंबईलाच रोजगारासाठी स्थायिक
होत आहेत. पण, आता ही सर्व मंडळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरी परतली आहेत.

सुमारे एक लाख लोक साताऱ्यात स्वगृही आलेले आहेत. त्यापैकी 40 टक्के
लोकांना सातारा जिल्ह्यातच रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. पण, त्यांनी बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन काम करण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात कामाला पसंती देणे
गरजेचे आहे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व स्थानिक उद्योजक यांनी एकत्रितपणे भूमिका घेऊन अशा सुशिक्षित बेरोजगारांना जिल्ह्यातच काम उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यातील रोजगार नोंदणी... 

-रोजगार नोंदणी- 1,77,090 
-एकूण पुरुष - 1,29,444 
-एकूण महिला- 47,624 

रोजगार, नोकरीसाठी तालुकानिहाय नोंदणी... 

जावळी : पुरुष- 4,558, महिला-1,751. सातारा : पुरुष-28,599, महिला-12,659, तृतीयपंथी -सात. कऱ्हाड : पुरुष- 23,127, महिला-7,527, तृतीयपंथी पाच.
खंडाळा : पुरुष- 7,365, महिला- 4,501. खटाव : पुरुष-12,271, महिला-3,507, 
तृतीयपंथी एक. कोरेगाव : पुरुष-12,601, महिला-3,959, तृतीयपंथी तीन. महाबळेश्वर : पुरुष- 1,824, महिला-1,097. माण : पुरुष- 7,406, महिला-1,969.
पाटण : पुरुष- 10,782, महिला-3,620. फलटण : पुरुष- 12,876, महिला-3,807, 
तृतीयपंथी चार. वाई : पुरुष- 8,035, महिला-3,227, तृतीयपंथी दोन. 

कौशल्य विकास... 

-आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी : 7,981 
-रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त उमेदवारांची संख्या : 4,149 
-यामध्ये रोजगार मिळालेले : 4,063 
-स्वयंरोजगार मिळालेले : 86 

loading image