दूधउत्पादकांसाठी गुडन्यूज ः "महानंदा' घेणार राज्यातील दहा लाख लिटर दूध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या शेतकरीहिताच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली. यासाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, "महानंदा'मार्फत जिल्हा दूध संघ व तालुका सहकारी दूध संघांचे अतिरिक्त दूध शासनदराप्रमाणे 25 रुपये लिटर या हमी भावाने संकलित करण्याचे निश्‍चित केले आहे.

संगमनेर ः कोरोनाचा मोठा परिणाम राज्यातील दूधउत्पादकांवर झाला आहे. "लॉक डाऊन'मुळे सहकारी दूध संघांना एक दिवस दूधपुरवठा बंद करावा लागला होता. ग्रामीण भागातील दूधव्यवसायास याचा मोठा फटका बसला आहे. या सर्वांना दिलासा देण्यासाठी राज्यात उत्पादित होणारे अतिरिक्त 10 लाख लिटर दूध "महानंदा' खरेदी करणार असल्याची माहिती "महानंदा'चे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी दिली आहे. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत सरकारने उचललेल्या पावलांबाबत माहिती देताना देशमुख म्हणाले, """लॉक डाऊन'मुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा व तालुका सहकारी दूध संघांकडेही अतिरिक्त दूध शिल्लक राहिल्याने, दूध संघ बंद ठेवण्याची वेळ येऊ नये म्हणून दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला (महानंदा) मार्ग काढण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या शेतकरीहिताच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली. यासाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, "महानंदा'मार्फत जिल्हा दूध संघ व तालुका सहकारी दूध संघांचे अतिरिक्त दूध शासनदराप्रमाणे 25 रुपये लिटर या हमी भावाने संकलित करण्याचे निश्‍चित केले आहे.

रोज सुमारे 10 लाख लिटर दुधाची भुकटी महासंघ आणि सहकारी व खासगी दूध संघांच्या प्रकल्पांद्वारे तयार करण्यात येणार आहे. ही योजना येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होईल. तयार झालेली दूधभुकटी साठविण्याची व्यवस्था शासनाने केली आहे.

दूधव्यवसायाची परिस्थिती सुधारल्यानंतर या पावडरची विक्री करून, त्यातून मिळणारी रक्कम राज्य शासनास परत केली जाईल. महाविकास आघाडी शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील दूधउत्पादकांना दिलासा मिळाला असून, शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News for Milk Producers "Mahananda" will consume one million liters of milk in the state