आटपाडी राडा प्रकरण: गोपीचंद पडळकर,तानाजी पाटलांचा अर्ज फेटाळला : Gopichand Padalkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand Padalkar

आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला.

गोपीचंद पडळकर,तानाजी पाटलांचा अर्ज फेटाळला ; आटपाडीत पोलिस तैनात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: आटपाडी राडा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील (Tanaji Patil) यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली. त्या अर्जावर आज सुनावणी झाली असून, न्यायालयाने तो अर्ज पेटाळला. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली.

दरम्यान, आमदार पडळकर यांच्या अर्जाच्या सुनावाणीसाठी सरकारपक्षातर्फे रियाझ जमादार, तर बचाव पक्षाकडून ॲड. प्रकाश जाधव यांनी काम पाहिले. तर पाटील यांच्याकडून सरकारपक्षातर्फे ए. एन. कुलकर्णी, तर बचाव पक्षाकडून ॲड. दीपक शिंदे यांनी काम पाहिले.

अधिक माहिती अशी, की जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या. दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. आमदार पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची आलीशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली व न्यायालयाने अर्ज फेटाळला.

दरम्यान, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह उपनिरीक्षक महंमद रफीक शेख, महादेव नागणे, सचिन कनप, मच्छिंद्र बर्डे, संदीप गुरव, सविता माळी यांच्या पथकाचा मोठा बंदोबस्त न्यायालय परिसरात होता.

आटपाडीत छापेमारी

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून आटपाडी आणि परिसरात छापेसत्र सुरू आहे. आज न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर एलसीबीसह पोलिसांची जादा कुमक आटपाडी तालुक्यात तैनात करण्यात आली आहे.

loading image
go to top