माणमध्ये गोरेंचे तर फलटणला निंबाळकरांचेच राज्य

माणमध्ये गोरेंचे तर फलटणला निंबाळकरांचेच राज्य

फलटण आणि माणमधील सत्तेची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहेत. एकाच घराण्यातील वेगवेगळ्या व्यक्तींचा राजकारणावर अंकुश हे दोन्ही मतदारसंघातील साम्य आहे. फलटणमधील पान नाईक-निंबाळकर यांच्याशिवाय हलणार नाही. तर माणमध्ये गोरे यांचे घर सत्तेच्या खेळी ठरवीत आहे. फलटणमध्ये निंबाळकरांच्या एकतर्फी अंमलाविरोधात कोणी शह देण्याचा प्रयत्न करू शकेल, अशी स्थिती उरली नाही. मतदारसंघ राखीव असला तरी नाईक-निंबाळकर म्हणतील ती पूर्व दिशा असल्याने ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने काँग्रेससह दुसरा पक्ष येथील रिंगणात नावासाठी असणार आहे. माणमध्ये गोरे घराभोवती सत्तेची सूत्रे फिरणार असली तरी भाऊबंदकीच्या खेळात इतर नेते आणि पक्षांना त्यांच्यामागे धावावे लागणार, हे नक्की आहे. त्यामुळेच दोन्ही मतदारसंघांतील सत्तेसाठीची साठमारी दोन घरांभोवती फिरणार आहे.  

सत्तेसह सहा निंबाळकर सभागृहात दाखल

फलटणला जिल्हा परिषदेची निवडणूक फारच सामंजस्याने झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व सिद्ध झाले असले तरी फक्त एकाच घराने रचलेल्या डावपेचांनुसार इतरांनी चालण्याची दिशा या निवडणुकीत पक्की झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या सूत्रांची जबाबदारी अधिकृतपणे रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे सोपविली गेल्यामुळे यावेळी त्यांची ताकद भलतीच वाढल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषेदच्या सातपैकी चार सदस्य निंबाळकर आहेत, अशी गोष्ट राज्यात इतरत्र खचितच घडली असावी. संजीवराजे नाईक-निंबाळकर (तरडगाव गट), त्यांची पत्नी शिवांजलीराजे नाईक- निंबाळकर (साखरवाडी गट) सलग पाचव्यांदा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पोचले आहेतच. पण, त्यांच्यासह कांचन निंबाळकर (विडणी गट) (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस) आणि काँग्रेसच्या जिजामाला नाईक-निंबाळकर (गिरवी गट) आदी निंबाळकरही जिल्हा परिषदेसाठी विजयी झाले आहेत. रामराजेंचे पुतणे विश्‍वजितराजे नाईक-निंबाळकर (वाठार निंबाळकर गण) व शिवरूपराजे निंबाळकर (आसू गण) हे दोन निंबाळकर पंचायत समितीसाठी विजयी झाले आहेत. फलटणच्या राजकारणातील (कै.) चिमणराव कदम यांचा गट कमकुवत करण्यात निंबाळकर गटाचे डावपेच यशस्वी झाले. भाजपकडून मैदानात उतरलेल्या सह्याद्री चिमणराव कदम यांना पराभव पत्करावा लागला. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रामदास कदमही पराभूत झाले. काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला नाईक-निंबाळकर विजयी झाल्या. सातपैकी एकाच गटात काँग्रेसला विजय मिळतो, ही बाबच लक्षणीय आहे. काँग्रेसचे आणखी एक नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांचे चिरंजीव धनंजय हिंगणगाव गटातून पराभूत झाले. तरडगाव, पाडेगाव, साखरवाडी, सस्तेवाडी, विडणी, सांगवी, गुणवरे, आसू, कोळकी, बरड, वाठार निंबाळकर, हिंगणगाव या बारा गणांतून विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीची निर्विवाद सत्ता मिळविली. गिरवी व सुरवडी गणांतून काँग्रेसचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे ‘निंबाळकर बोले, फलटण हाले’ अशी आधीच मजबूत असलेली स्थिती या निकालाने आता भक्कम केली आहे. केवळ फलटणच नव्हे तर जिल्हा हलविण्याची ताकद फलटणकडून राष्ट्रवादी काँग्रेस व निंबाळकरांना मिळालेली आहे. अध्यक्षपदही निंबाळकरांकडेच जाईल. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही निंबाळकरच भारी ठरणार आहेत.

संजीवराजे यांची दावेदारी निश्‍चित
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची दावेदारी निश्‍चित मानण्यात येते. केवळ रामराजे यांचे बंधू एवढीच त्यांची जमेची बाजू नाही. तर त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे. विधानसभेचा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांच्या कर्तृत्वाला मर्यादा आहेत. विधान परिषदेत खुद्द रामराजे नाईक-निंबाळकर असल्याने तेथेही संधीची शक्‍यता कमी आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडून जाण्याची त्यांची पाचवी वेळ आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी पेललेले आहे. त्यांच्याइतका ज्येष्ठ सदस्य सभागृहात नाही. यापूर्वी कधी नव्हे ते काँग्रेसपेक्षा वेगळे विरोधक सभागृहापर्यंत पोचले आहेत. त्यामुळे संजीवराजेंचा अनुभव सभागृहाच्या कामकाजासाठी उपयोगी ठरणारा आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहात झालेले खच्चीकरण लक्षात घेता पक्षही त्यांच्याशिवाय इतर नावाची जोखीम स्वीकारेल, असे वाटत नाही.  
 

माणमधील सत्तेची धुरा गोरे बंधूंच्या खांद्यांवरच

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसपुढे सातत्याने नामुष्कीची वेळ आणणारे माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे या निवडणुकीत मात्र चांगलेच अडचणीत सापडले. त्यांचेच बंधू शेखर गोरे यांनी मरगळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी मिळवून दिली आहे. माण मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या आठ गटांपैकी आंधळी, मार्डी, गोंदवले, निमसोड, औंध, मायणी अशा सहा मतदारसंघांतून राष्ट्रवादी काँग्रेसला विजय हस्तगत करता आला आहे. तर बिदाल हा एकमेव गट काँग्रेसकडे राहिला आहे. कुकुडवाड गटातून भाजपने माणच्या राजकारणात विजयी शिरकाव केला आहे. माण व खटाव दोन्ही पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. ही स्थिती जयकुमार गोरे यांच्यासाठी धोक्‍याची घंटा आहे, असे मानले जात आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली ताकद टिकविण्याची कसोटी आता शेखर गोरे यांच्यापुढे असणार आहे. माणमधील किंगमेकर (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुना जिल्हा परिषदेच्या सभागृहात एकाच वेळी प्रवेश करणार आहेत. अनिल देसाई यांच्या रूपाने मतदारसंघातील भाजपला मिळालेला चेहराही लक्षात घ्यायला हवा. कारण विधानसभेच्या वेळी भाजप येथे पूर्ण ताकदीनुसार उतरण्याची शक्‍यता आहे. विस्कळित झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीमुळे एकसंध झाल्याचे चित्र सध्या दिसत असले तरी गटबाजी पुन्हा डोके वर काढणार नाही, याकडे लक्ष दिले तरच राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहण्याची शक्‍यता आहे; अन्यथा जयकुमार गोरे यांचेच डावपेच वरचढ ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीत गोरे बंधू एकमेकांविरोधात ठाकले आहेत. तेव्हापासून माणमधील राजकारणाची समीकरणे बदलून गेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस गटबाजीत विखुरली होती. नंतर मूळचा गट, नेते आणि कार्यकर्ते दोघांपैकी एका गोरेंच्या वळचणीला आल्याची परिस्थिती निर्माण झाली. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर शेखर गोरेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळे काहीजण पुन्हा प्रवाहात आले. विधान परिषदेतील पराभवानंतर शेखर गोरेंनी म्हसवडची नगरपालिका ताब्यात घेतली. त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांच्या वर्चस्वाला धक्का दिला. यापुढेही या दोन्ही बंधूंमध्येच लढती होतील. भारतीय जनता पक्षानेही एक गट आणि एक गण जिंकून उभारी मिळविली आहे. दोघांमध्ये तिसरा पर्याय ठरण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, यात शंका नाही. त्यातच माणमध्ये अनिल देसाई यांच्याबरोबर आलेली नवी मंडळी आणि जुने कार्यकर्ते असा संभ्रम झाला नाही तरच भाजपचे प्रयत्न त्यांना हव्या त्या दिशेने जाऊ शकतात. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. माण तालुक्‍यातील निवडणुका पूर्वीइतक्‍या साध्या राहिल्या नाहीत. साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतीचा अवलंब करणारा नेता किंवा पक्ष वरचष्मा मिळवितो, अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप त्यादृष्टीने तयारी सुरू करण्याची चिन्हे आहेत. तरीही सत्तेच्या चाव्या गोरेंच्या घरातच राहण्याची शक्‍यता सध्यातरी बळावलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com