ढोराळे तलावात टेंभुचे पाणी होणार दाखल...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार ; आमदार बाबर यांच्या प्रयत्नाला यश

लेंगरे (सांगली) - टेंभू योजनेच्या पाण्यासाठीची लेंगरेकरासह,जाधववाडीकरांची प्रतीक्षा अखेर लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.गोरेवाडी उजव्या कालव्याच्या लांबी वाढवून ढोराळे तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.यामुळे सहाव्या टप्प्याची वाट पहावी लागणार नाही.टेंभुच्या लांबी वाढविण्याच्या वितरिकेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.अशी माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली.

  ग्रामीण भागाच्या शेतीसाठी वरदान ठरलेली टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मतदारसंघात फिरले आहे.या पाण्यापासून वर्षानुवर्षे वंचित असणार्या घाटमाथ्यावर पाचवा टप्प्यामुळे पाणी पोहचल्यामुळे वर्षभरापासून सगळीकडे हिरवळ पसरली आहे.आराखडा तयार करतानाच टेंभुच्या सहाव्या टप्प्यांमधून गोरेवाडी मधून पाईपलाईन द्वारे टेंभुचे पाणी जाधवाडी तलावातून पुढे ढोराळेकडे सोडण्यात येणार होते.याच पाईपलाईनची वितरीका वाढून टेंभूचे पाणी ढोराळे पाझर तलाव सोडण्याचे नियोजन होते.परंतु आता पाणी ढोराळेच्या तलावात येण्यासाठी वाट पाहण्याची गरज भासणार नाही.पाचव्या टप्प्यातूनच पाणी ढोराळे तलावात पडणार आहे.यामुळे लेंगरेचा शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

टेंभुच्या पाचव्या टप्प्यातून ढोराळे तलावात द्यावे,  यासाठी जाधववाडी ढोराळे गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य यांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत मागणी केली होती.लेंगरे परिसरासह गावठाणात असणारी मोठी शेती ढोराळे पाझर तलावावर अवलंबून आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी देखील तशी मागणी केली होती. यासाठी आमदार बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा करून ढोराळे तलावात पाचव्या टप्प्यातून पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.त्यासाठी महत्त्वाचे पहिले पाऊल पडले आहे.जाधववाडी तलावातून पाईपलाईन वाढवून पाणी ढोराळे गावाच्या पुर्वेकडील ओढ्यातून ढोराळे तलावात पाणी सोडण्यासाठी आमदार बाबर यांनी सूचना दिल्या आहेत.त्यामुळे दुष्काळी भाग म्हणून असणारा ठपका आता कायमचा पुसला जाणार आहे. जाधवाडी, वाळूज परिसरातील शेतकऱ्यांनी याचा प्रत्यक्ष फायदा लाभ होणार आहे.टेंभुचे पाणी तलावात येणार असल्याने शेतकर्यातुन समाधान व्यक्त होत आहे.

आमदारांचा पाठपुरावा

घाटमाथ्यावर टेंभुचे पाणी आले असले तरी जाधववाडी, ढोराळे परिसर अद्याप पाण्यापासून वंचित होता.तलावात पाणी सोडण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी आमदार अनिल बाबर सातत्याने पाठपुरावा केला.त्यांनीही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना वेळोवेळी दिले होते.आता या कामाला प्रत्यक्ष रित्या काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.आमदार बाबर यांनी दिलेला शब्द पाळला आहे.त्यामुळे दुष्काळी भागातील शेतीच्या पाणी प्रश्न संपुष्टात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Gorewadi right canal will be extended and the water will be released into the dhorale