तालुक्यातील ४ हजार ५११ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला होता. त्यापैकी २ हजार ९७२ शेतकऱ्यांना ७ कोटी २५ लाख ५१ हजार ६०७ रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
कडेगाव : केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Prime Minister Agriculture Irrigation Scheme) शेतकऱ्यांसाठी ‘प्रति थेंब अधिक पीक’ घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबविण्यात येते. यामध्ये तालुक्यातील १ हजार ५३९ शेतकऱ्यांचे सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील ठिबक सिंचनचे ४ कोटी ९० लाख ५२ हजार ४४४ रुपयांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात असून ठिबकचे अनुदान कधी मिळणार? याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत.