
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये फायर ऑडिटमध्ये 'फेल' झाली आहेत. सर्व रुग्णालयांत अग्नीशमन सिलेंडर वगळता आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी आग प्रतिबंधक कायद्यान्वये आवश्यक उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे.
सांगली : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये फायर ऑडिटमध्ये 'फेल' झाली आहेत. सर्व रुग्णालयांत अग्नीशमन सिलेंडर वगळता आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी आग प्रतिबंधक कायद्यान्वये आवश्यक उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने हे ऑडिट केले आहे. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करुन घेतले. अग्निशमन विभागाने जिल्ह्यातील 17 शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी आपल्या पथकासह जिल्ह्यातील दोन शासकीय रुग्णालये आणि 15 ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण केले. तेथील आग प्रतिबंधक सुविधा आणि आगीसारख्या दुर्घटनेवेळी आवश्यक यंत्रणा आहे का? याची तपासणी करण्यात आली. आग प्रतिबंधक कायद्यान्वये आवश्यक उपाययोजना या रुग्णालयांत आहेत का ? याचीही तपासणी करण्यात आली. मात्र सर्वच ठिकाणी यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिलेल्या आदेशानुसार 19 ते 28 जानेवारी अखेर अग्निशमन अधिकारी श्री. कांबळे यांनी जिल्ह्यातील 15 उपजिल्हा रुग्णालये आणि सांगली व मिरजेचे सिव्हिल हॉस्पिटल अशा 17 रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण केले.
महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. कांबळे म्हणाले,"" जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांची तपासणी करण्यात आली. पलूस, चिंचणी वांगी, कडेगाव, विटा, भिवघाट, आटपाडी, तासगाव, आष्टा, इस्लामपूर, शिराळा, कोकरूड, कवठेमहांकाळ, जत, माडग्याळ, बेळंकी येथील हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट केले. या सर्व ठिकाणी अग्निशमन उपकरणे म्हणजे फक्त सिलेंडर आहेत. आगप्रतिबंधक व जीव संरक्षक कायदा 2006 नुसार जे निकष शासनाने घालून दिले आहेत, त्यातील कोणत्याही सुविधा या ठिकाणी नाहीत.''
शिराळा आणि इस्लामपूर आरोग्य केंद्रामध्ये काही सुविधा आहेत. मात्र शिराळ्यातील सुविधा बंद आहेत. त्याची देखभाल होत नाही. तर इस्लामपूरमध्ये टाटांनी दिलेल्या निधीतून नवीन इमारत बांधली आहे. तेथे फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर बसवण्यात आला आहे. बेळंकी येथील रुग्णालयाची इमारत धोकादायक अवस्थेत आहे. तेथे रुग्ण ठेवणेही धोकादायक आहे, असे ऑडिटच्या वेळी दिसून आल्याचे श्री. कांबळे म्हणाले,""महापालिकेच्या सांगली, मिरजेतील प्रसूती गृहांमध्येही अग्नीशमनरोधन सुविधा नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल केले जातात तेथे फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर अशा सुविधा असणे गरजेचे आहे.''
शासकीय रुग्णालयांत अग्निशमन उपकरणे म्हणजे फक्त सिलिंडर दिसून आले. इतर सुविधा नाहीत. फायर हायड्रंट सिस्टीम, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर आवश्यक आहेत. आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्गही दिसले नाहीत. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. अहवालात याचा सविस्तर उल्लेख केला आहे.
-चिंतामणी कांबळे, अग्निशमन अधिकारी, मनपा
संपादन : प्रफुल्ल सुतार