शासनाने तातडीने ऑक्‍सिजन प्लॅंट उभारावा...यांनी केली मागणी

बलराज पवार
Sunday, 6 September 2020

सांगली-  कोरोनाचे संकट गहिरे होत चालले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्रशासन खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्यांचे कोविड हॉस्पिटल करत आहे. मात्र तरीही रुग्णांना ऑक्‍सिजन, व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. ऑक्‍सिजनची पातळी कमी होणाऱ्या रुग्णांना नियमित ऑक्‍सिजनचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने ऑक्‍सिजन निर्मितीचा प्लॅंट उभा करावा अशी मागणी कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीचे सतीश साखळकर यांनी केली आहे.

बाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे. 
कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. ऑक्‍सिजन बेड अभावी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्‍सिजन प्लॅंट आहे. मात्र त्याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांना होत आहे. सांगलीची गरज पुर्ण करण्यासाठी नवीन ऑक्‍सिजन प्लॅंट उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

भविष्याच्या दृष्टीने तरी तातडीने सांगलीत ऑक्‍सिजन निर्मितीचा प्लॅंट शासनाकडून अथवा खाजगीकरणातून उभा करणे अत्यंत आवश्‍यक आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह आहेत. सध्या कोल्हापूर, सातारा, पुणे येथून ऑक्‍सिजन पुरवठा होतो. पण, तेथील गंभीर परिस्थिती पाहता त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत अशीही मागणी निवेदनात केली आहे. समितीच्या वतीने आयुक्तांनाही व्हेंटिलेटर संदर्भात निवेदन दिले आहे. व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने चाळीस व्हेंटिलेटर खरेदीचा चांगला निर्णय घेतला. परंतु प्रारंभी आलेले दहा व्हेंटिलेटर शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांना विभागून दिलेले आहेत. मात्र तेथे रुग्णांना उपचारासाठी पैसे भरावे लागत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेने खरेदी केलेले व्हेंटिलेटर आदिसागर कोविड सेंटर व सांगली, मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये बसवण्यात यावेत अशी मागणीही निवेदनात केली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government should immediately set up an oxygen plant