पानसरे हत्येमागे कोल्हापूर कनेक्शन

पानसरे हत्येमागे कोल्हापूर कनेक्शन

कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात पुढे येत आहे. असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी आज जिल्हा न्यायालयात केला. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर संशयित कळसकरला 24 जूनपर्यंत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. राऊळ यांनी पोलिस कोठडी सुनावली. 

पानसरे हत्येतील पिस्तूलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून 11 जूनला संशयित शरद भाऊसाहेब कळसकरला एसआयटीने अटक केली. त्याला सात दिवसाची कोठडी न्यायालयाने सुनावली होती. ही कोठडी आज संपली. त्यामुळे संशयित कळसकरला एआयटीने आज सकाळी मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. सुनावणी दरम्यान तपासी अधिकारी अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी केस डायरी (तपासाबाबतचा बंद अहवाल) न्यायालयात सादर केला. यानंतर विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सरकारपक्षातर्फे युक्तीवाद केला. त्यात संशयित कळसकर हा यापूर्वी या गुन्ह्यात साक्षीदार होता. तो आता या गुन्ह्यातील संशयित आहे. 14 जूनला एसआयटीने मुंबई उच्च न्यायालयात तपासाबाबतचा अहवाल बंद लिफाफ्यातून सादर केला आहे. यामध्ये अत्यंत गोपनीय व महत्वाची माहितीचा समावेश आहे. 

हत्येपूर्वी बेळगाव येथील जांभोटी व किणये याठिकाणी झालेल्या प्रशिक्षणासह स्टॅंन्डवरील बैठकीत संशयित डॉ. वीरेंद्र तावडे, अमित डेगवेकर, कळसकरसह आणखी दोघांचा समावेश होता. त्यातील एक कोल्हापुरात तर दुसरा कर्नाटकातील होता. याची माहिती तपासात संशयित कळसरकर देतो मात्र संबधितांची नावे तो सांगत नाही. कर्नाटकासह कोल्हापुरातील कोण दोघे जण होते. या दोघा संशयितांचा शोध घ्यायचा आहे. त्याचबरोबर कळसकरने त्याचा मोबाईल व डायरी याची विल्हेवाट लावली आहे, अशी माहितीही तपासात पुढे येत आहे. या दोन्ही ठिकाणी त्याला नेऊन तपास करावयाचा आहे. संशयित तावडे व डेगवेकर या दोघांनी संशयित कळसकरकडे हत्यार जोडणीची व विल्हेवाटाची जबाबदारी सोपवली होती. ते काम त्याने कोल्हापुरात कोठे केले. तो शहरात कोणत्या नावाने रहात होता. यासंदर्भातील माहिती तपास यंत्रणेला घ्यायची आहे. त्यामुळे कळसकरच्या पोलिस कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी अॅड. राणे यांनी युक्तीवादात केली. 

संशयित कळसकरचे वकील समीर पटवर्धन यांनी हत्येच्या तपासात प्रगती नाही. कळसकर 2015 मध्ये मोबाईल वापरत होता. तो त्याने कोठे ठेवला हे शोधणे अथवा सांगणे अवघड आहे. तपास यंत्रणा तेच तेच संशयित वेगवेगळ्या गुन्ह्यात दाखवत आहेत. त्यामुळे आता पोलिस कोठडीत वाढ दिली जाऊ नये, असा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर संशयित कळसकरला न्यायालयाने सात दिवसाची कोठडी सुनावली. 

पाटील नावाने शहरात वावर? 
संशयित कळसकर हा कोल्हापुरात पाटील नावाने वावरत होता अशी माहिती तपसा यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यानुसार तो कोठे राहत होता. याचा शोध यंत्रणेकडून सुरू असल्याचे समजते. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com