esakal | देवस्थानांतील 75 लाख कोटींचे सोने ताब्यात घ्या : पृथ्वीराज चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

Fight with Corona

अर्थव्यवस्थेच्या दहा ठक्के रक्कम सरकारने खर्च करून ती रक्कम लोकांच्या खिशात गेली पाहिजे. त्यातून जनतेची क्रयशक्ती वाढली पाहिजे, त्यांना जगविता आले पाहिजे. गेली दोन महिने कोणालाही रोजगार मिळालेला नाही की पगार मिळालेला नाही. आता लोकांना वाचविणे गरजेचे आहे.

देवस्थानांतील 75 लाख कोटींचे सोने ताब्यात घ्या : पृथ्वीराज चव्हाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : देशातील विविध सार्वजनिक धार्मिक ट्रस्टमध्ये ७५ लाख कोटी रूपयांचे सोने पडून आहे. हे सोने केंद्र सरकारने एक दोन टक्के व्याजावर व परतीच्या बोलीवर ताब्यात घेऊन त्यातून देशातील कोरोनाबाधित लोकांचा जीव वाचवावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 


कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट हे सर्व संकटापेक्षा अवघड संकट आहे. या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रूपये खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे, असे स्पष्ट करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाच्या एकुण अर्थव्यवस्थेच्या दहा टक्के रक्कम केंद्र सरकार खर्च करणार आहे. 

गेल्या महिनाभरापासून २१ लाख कोटी रूपये खर्च करावेत, अशी मागणी मी स्वतः करत आलो आहे. त्यानुसार पंतप्रधानांनी घोषणा केली असून या घोषणेचे स्वागतच केले पाहिजे. आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थिक पॅकेजचे विश्लेषण करणार आहेत. मुळात केंद्र सरकारने जाहिर केलेल्या पॅकेजमध्ये रिझर्व्ह बँकेने दिलेल्या कर्जाचीही मोजणी केली. आतापर्यंत आरबीआयने चार ते पाच लाख कोटींचे कर्ज देशाला जाहीर केलेले आहे. हे कर्ज मिळून हे २० लाख कोटी रक्कम होणार असेल तर आमची घोर निराशा होईल.

 अर्थव्यवस्थेच्या दहा ठक्के रक्कम सरकारने खर्च करून ती रक्कम लोकांच्या खिशात गेली पाहिजे. त्यातून जनतेची क्रयशक्ती वाढली पाहिजे, त्यांना जगविता आले पाहिजे. गेली दोन महिने कोणालाही रोजगार मिळालेला नाही की पगार मिळालेला नाही. आता लोकांना वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्मला सितारामन यांच्या विश्लेषणाची आपण वाट पाहू या.

मुळात पैसे उभे करण्याचे अनेक मार्ग आहेत. देशातील सर्व धार्मिक, देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्याप्रमाणात सोने पडून आहे. हे सोने सरकारने व्याजावर घ्यावे. एक दोन टक्के व्याजदराने परतीच्या बोलीवर हे सोने ताब्यात घेऊन वापरले पाहिजे व लोकांचे जीव वाचविला पाहिजे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल ही सोन्यासंदर्भातील जागतिक संघटना आहे.या संघटनेच्या माहितीनुसार आपल्या देशातील विविध धार्मिक ट्रस्टमध्ये ७५ लाख कोटी पेक्षा जास्त किंमतीचे सोने पडून आहे. या सोन्याचा जनतेचा जीव वाचविण्यासाठी वापर झाला पाहिजे. कारण ही सर्व संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आहे. ती सरकारने ताब्यात घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.