शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आता ग्रामकृषी समिती; 14 जणांची समितीची होणार स्थापना 

विष्णू मोहिते
Sunday, 25 October 2020

राज्य ग्रामपंचायत अधिनियमनुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये ग्रामकृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच कृषी विषयक योजनाची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.

सांगली ः शेतकऱ्यांना गावामध्ये शेतीचा सर्वांगीण विकासासाठी, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या विविध योजना व प्रकल्पामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी, राज्य ग्रामपंचायत अधिनियमनुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये ग्रामकृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच कृषी विषयक योजनाची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी चौदा जणांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील काही ठराविक नागरिक पुन्हा-पुन्हा शासनाच्या योजनाचा लाभ घेतात. त्याला चाप बसणार आहे. 

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायशी निगडित असते; परंतु हवामानातील बदल, निसर्गाचा अनियमितपणा, पर्जन्यमान, कीडरोग, सुधारित जातींची बियाणे उपलब्ध न होणे, शेती मालाच्या दरामध्ये घसरण होणे आदी कारणांमुळे शेती व्यवसायातून शाश्‍वत उत्पन्न मिळेल, याची खात्री देता येत नाही. या सर्व समस्यांवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने ग्राम कृषी विकास समिती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्थापन करण्याचा निर्माण घेतला आहे. कृषीयोजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचणे शक्‍य होणार आहे. 

शेतकऱ्यांपर्यंत कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, कीड नियंत्रण, यांत्रिकीकरण, संरक्षण, शेती व फळबाग लागवडीविषयक माहिती शेतकऱ्यांना पोचवली जाणार आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समितने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करावयाचे आहे.

पीक काढणी तंत्रज्ञान व बाजारपेठेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, शेतीसाठी आवश्‍यक कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंका, सहकारी संस्था यांची माहिती तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या कृषीविषयक प्रासंगिक समस्थावर विचारविनिमय करून कृषी विभागाच्यावतीने संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. याबाबतची कार्यवाही समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. कृषी सहायकाच्या समन्वयाने ग्रामसेवकानी सभांचे आयोजन करावयाचे आहे. प्रत्येक महिन्यातून किमान एक सभा होणे आवश्‍यक आहे. 

अशी असेल ग्रामकृषी समिती... 
ग्रामकृषी विकास समितीत 14 सदस्य असतील. यामध्ये सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. उपसरपंच पदसिद्ध सदस्य असतील. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सदस्य सचिव तर कृषी सहाय्यक सहसचिव असतील. शिवाय ग्रामपंचायत सदस्य, तीन प्रगतशील शेतकरी, त्यामध्ये एक महिला, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांचा एक प्रतिनिधी, महिला बचत गटाचा एक प्रतिनिधी, कृषी पूरक व्यवसायातील दोन शेतकरी आणि तलाठी अशा 14 प्रतिनिधींचा समावेश असेल. समितीची मुदत ग्रामपंचायतीच्या मुदती इतकीच असेल. नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर दीड महिन्यात ग्रामकृषी समिती स्थापन करणे आवश्‍यक असणार आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Krishi Samiti now for the guidance of farmers; A 14-member committee will be formed