गावात कोविड केअर सेंटरच्या निधीबाबत ग्रामपंचायत हतबल 

अजित झळके
Thursday, 10 September 2020

जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता शोध मोहिम, रुग्णांची दक्षता, सर्वेक्षण सारे काम गतीने करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे.

सांगली ः सांगली, मिरजेसह शहरांतील कोविड सेंटरवर प्रचंड ताण वाढला आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना संस्था क्वारंटाईन करतानाही जागा कमी पडू लागली आहे. अशावेळी गाव पातळीवर कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे.

त्यात आर्थिक गुंतवणूकीपासून ते व्यवस्थापणापर्यंत अनेक अडचणी समोर आल्या आहेत. वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना खर्च करण्याचा अधिकार नाही, शिवाय अन्य निधीची उपलब्धता अत्यंत तोकडी आहे. अशावेळी लोक वर्गणीतून हे सेंटर चालवण्याशिवाय पर्याय नाही. त्यात अनेक मर्यादा येत आहेत. 

जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता शोध मोहिम, रुग्णांची दक्षता, सर्वेक्षण सारे काम गतीने करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी प्राथमिक शाळा किंवा हायस्कूल किंवा मंगल कार्यालयात सोय करण्याचे धोरण आहे. त्यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी नागरिकांशी, गावकारभाऱ्यांशी संवाद सुरु केला आहे. त्यात आर्थिक नियोजन हीच मोठी अडचण ठरण्याची चिन्हे आहेत.

शिवाय, वैद्यकीय सेवा कुणी पुरवायची, खासगी डॉक्‍टरांना सेवा दिली तर त्यांच्या शुल्काचे काय, असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यावर लोकवर्गणी हाच सध्याचा पर्याय दिसतो आहे. या स्थितीत ग्रामपंचायत काही गुंतवणूक करू शकेल का, याबाबत गावकरी विचार आहेत. त्याबाबत ग्रामपंचायतीने हतबलता व्यक्त केलीय. 
 
हे करता येणे शक्‍य 

* बेड खरेदी करावी लागणार 
* गादी, पांघरून रुग्णांना आणावे 
* जेवणाची सोय घरातूनच करावी 
* स्थानिक खासगी डॉक्‍टरांनी आलटून-पालटून तपासणीला जावे 
* घरपट्टी, पाणीपट्टीतील आवश्‍यक निधी खर्चावा 
* गावातील तरुण मंडळांनी स्वयंसेवक म्हणून काम करावे 
* एक रुग्णवाहिका कायम स्वरुपी भाड्याने घ्यावी 
* ऑक्‍सिजन पुरवठा यंत्रे स्वयंसेवी संस्थांकडून घेणे शक्‍य 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat is concerned about the funding of Kovid Care Center in the village