esakal | ग्रा. पं. निवडणुका : महाविकास आघाडी, भाजप समर्थकांतच लढाई; जमवाजमव सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Gram panchayat Elections : Mahavikas Aghadi, BJP supporters fight; The gathering continues

कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

ग्रा. पं. निवडणुका : महाविकास आघाडी, भाजप समर्थकांतच लढाई; जमवाजमव सुरू

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली ः कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षीय पातळ्यांवर या निवडणुका होत नसल्या तरीही स्थानिक नेत्यावर पक्षांचा शिक्का असतो. पर्यायाने त्याच पक्षाची ग्रामपंचायतीवर पकड नव्हे तर सत्ता असे मानले जाते.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि विधानपरिषद निवडणूक विजयानंतर मनोबल उंचावल्यानंतर प्रथमच 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, पालकमंत्री आणि आमदार आपापल्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात गावे ठेवण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यातील 699 गावापैकी 152 ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना तसेच भाजप नेते, आमदारांच्या समर्थकांच्या पॅनेलमध्ये लढतीसाठी जमवा-जमव सुरू झाली आहे. 

जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असल्या तरी सर्वाधिक निवडणुका तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील 52 गावांत होत आहेत. त्यात तासगाव तालुक्‍यातील 41 आणि कवठेमहांकाळमधील 11 गावांचा समावेश आहे. या ठिकाणी पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी भाजप खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील यांच्या गटात होईल. रोहन पाटील यांना येथे नेतृत्व दाखवण्याची संधी आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात आमदार पाटील, खासदार पाटील यांच्यासह भाजपचे नेते अजितराव घोरपडे गटात लढत अपेक्षित आहेत. काही गावात कॉंग्रेस पक्षाची ताकद आहे. त्या ठिकाणी दोन्ही कॉंग्रेस एकत्र लढण्यावर विचार होण्याची शक्‍यता आहे. 

जत तालुक्‍यातील 30 गावांच्या लढतीत थेट भाजप, कॉंग्रेस यांच्यात होतील. माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तमनगौंडा रवी यांच्यासह स्थानिक नेते नेतृत्व करतील. कॉंग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचे कार्यकर्ते प्रत्येक गावात रिंगणात असतील. राष्ट्रवादी तसेच जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते कॉंग्रेस यांच्याबरोबर राहून राजकीय नशिब आजमावतील. 

मिरज तालुक्‍यातील 20 गावांपैकी बहुतांश गावे आमदार सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातील आहेत. कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील, राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे, आप्पासाहेब हुळ्ळे यांच्यासह अनेकांन एकत्र येऊन लढावे लागेल. शिवसेनेच्या पासंगही काही गावात महाविकास आघाडीला महत्त्वाचा ठरेल. कवलापूर, मालगाव, आरग, म्हैसाळ या मोठ्या गावात ताकद पणाला लागेल. कवलापूर, मालगावात भाजपला मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मध्य भागात आमदार सुधीर गाडगीळ तर पश्‍चिम भागात पालकमंत्री जयंत पाटील यांचे लक्ष असेल. कवठेपिरान या मोठ्या गावाकडे पालकमंत्री पाटील यांची भूमिका महत्त्वाची असेल. येथील स्थानिक नेते भीमराव माने यांनी शिवसेना पक्षाला जवळ केले होते. सध्या एकत्र सत्ता असली तरी काय डावपेच राहणार हे आठवड्यात स्पष्ट होईल. 

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात 23 गावच्या निवडणुका आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिव पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, भाजपचे नेते राजेंद्र अण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर समर्थक निवडणुकीत असतील. काही ठिकाणी संयुक्त तर काही गावात आपापसात निवडणुका लढण्याचे संकेत आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघात राज्य मंत्री विश्‍वजित कदम यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे नूतन आमदार अरुण लाड असतील. भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांच्या गटातच लढती होतील. वाळवा व शिराळा तालुक्‍यात प्रत्येकी दोन गावांच्या निवडणुकांत स्थानिक गटच सक्रिय राहतील. 

सरपंचपद आरक्षणाची प्रतीक्षा... 
सांगली जिल्ह्यात 699 ग्रामपंचायती असून यापैकी या टप्प्यात 152 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. एप्रिल ते मे 2022 या कालावधीत एकाच टप्प्यात सुमारे 452 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. प्रभागनिहाय आरक्षण काढले आहे. सरपंच पदासाठी आरक्षण अद्याप काढण्यात आलेले नाही. त्यांचीही स्थानिकांना प्रतीक्षा आहे.

संपादन : युवराज यादव