द्राक्ष बागायतदारांना प्रतीक्षा व्यापाऱ्यांची;  विक्रीला पुढील महिन्यात येणार गती

विष्णू मोहिते
Saturday, 23 January 2021

जिल्ह्यात अद्याप द्राक्ष हंगाम गतीने सुरू झालेला नाही. सर्वसाधारणपणे 5 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात हंगामास गती येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही व्यापाऱ्यांची प्रतीक्षा आहे.

सांगली ः जिल्ह्यात अद्याप द्राक्ष हंगाम गतीने सुरू झालेला नाही. सर्वसाधारणपणे 5 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात हंगामास गती येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही व्यापाऱ्यांची प्रतीक्षा आहे.

निर्यातक्षम द्राक्षाची उचलही कमीच आहे. सध्या क्वचितच आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री सुरू झाली आहे. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल होत आहेत. त्यामुळे हंगामाला 5 फेब्रुवारीपासूनच गती येण्यास कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अवकाळी व प्रतिकूल वातावरणाचा दुष्परिणाम निर्यातक्षम मालावर होत असल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील काही भागांत आगाप छाटणी केलेल्या द्राक्षाची विक्री झाली होती. त्यानंतर फारशी खरेदी सुरू झाली नाही. द्राक्ष पिकास पोषक वातावरण असल्याने द्राक्षाची गोडी आणि वाढ चांगली होण्यास मदत होऊ लागली आहे. वास्तविक पाहता दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष बाजारपेठेत विक्रीस येतात.

जानेवारी महिन्याच्या मध्यावर देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतात. हळूहळू हंगामास गती येते. यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाचे विघ्न आले होते. त्यामुळे एकाच वेळी फळछाटणी झाल्याने एकाच वेळी द्राक्षाची काढणी सुरू होण्याची शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तुरळक ठिकाणी द्राक्ष विक्री सुरू झाली आहे. परंतु जानेवारी महिन्याचा मध्य झाला तरी, व्यापारी दाखल झाले नाहीत.

काही ठिकाणी व्यापारी दाखल झाले असले, तरी द्राक्षाची गोडी नसल्याने काढणीला सुरवात केली नाही. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम फेब्रुवारीच्या सुरवातीपासून सुरू होईल, आणि फेब्रुवारीच्या मध्यावर गती येईल, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. 

निसर्गाशी दोन हात 
धुके, ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस अशा अवकाळी व प्रतिकूल वातावरणाचा दुष्परिणाम निर्यातक्षम द्राक्षांवर होत आहे. द्राक्षांवर भुरी, घडकुज, दावण्या आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊन निर्यातीला तडाखा बसू नये, यासाठी शेतकरी दिवसाकाठी दोनदा औषध फवारण्या करीत आहेत. नुकसान होण्याच्या शक्‍यतेने सर्व जण हवालदिल झाले आहेत. मात्र, द्राक्ष उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तींविरोधात दोन हात करत अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी अद्यापही धडपडत आहेत. 

हंगाम उशिरा सुरू होईल.
यंदा द्राक्षाच्या हंगामाला प्रारंभापासून फटका बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करून बागा उत्तमरीत्या जोपासल्या आहेत. एकाच वेळी छाटणी झाल्याने हंगाम उशिरा सुरू होईल. 
- सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grape growers waiting for Traders; Sales will pick up speed next month