जिल्ह्यात केवळ 15 टक्के क्षेत्रावर द्राक्ष छाटण्या पूर्ण

विष्णू मोहिते
Monday, 5 October 2020

कोरोना महामारी, पाऊस, द्राक्ष बाजारपेठेबाबतची अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमिवर यंदा गोडी छाटणी हंगाम बराच लांबला आहे. सध्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर छाटण्या पूर्ण झाल्या असून ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात 60 टक्के तर शेवटच्या पंधरा दिवसात उर्वरित छाटण्यांसाठी शेतकऱ्यांचा भर असणार आहे. 

सांगली : कोरोना महामारी, पाऊस, द्राक्ष बाजारपेठेबाबतची अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमिवर यंदा गोडी छाटणी हंगाम बराच लांबला आहे. सध्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर छाटण्या पूर्ण झाल्या असून ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात 60 टक्के तर शेवटच्या पंधरा दिवसात उर्वरित छाटण्यांसाठी शेतकऱ्यांचा भर असणार आहे. 

यंदा द्राक्ष हंगामावर पावसाचे संकट आले होते. त्यामुळे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होणारी फळ छाटणी लांबली. पावसाने उघडीप दिली असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी फळ छाटणीस प्रारंभ केला असून येत्या पंधरवड्यात फळ छाटणीस गती येईल. मात्र, सध्या मजूरांची टंचाई भासते आहे. बिहारी मजूर आल्यानंतरही टंचाई कायम आहे. 

जिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे एक लाख 25 हजार एकरांवर द्राक्षाचे पिक घेतले जाते. सर्वसाधारणपणे मिरज तालुक्‍यात आगाप म्हणजे ऑगस्ट अखेरीस फळ छाटणी घेतली जाते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील इतर भागात फळ छाटणीस प्रारंभ होतो. सप्टेंबरच्या पंधरा दिवसांत 5-6 टक्के क्षेत्रावरील फळ छाटणी पूर्ण होते. त्यानंतर फळ छाटणीस गती येते. सप्टेंबर अखेर 10 ते 15 टक्के फळ छाटणी पूर्ण होते. ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात फळ छाटणी पूर्ण होते. 

मात्र, यंदा ऑगस्टमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आगाप फळ छाटण्या थांबल्या. शेतकऱ्यांनी सप्टेंबरपासून फळ छाटणी करण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, सप्टेंबर महिन्यात देखील मुसळधार पाऊस पडला. शेतांमध्ये पाणी साचले. या बदलत्या हवामानामुळे फळ छाटणी करणे मुश्‍कील झाले. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी फळ छाटणीचे नियोजन करू लागले आहे. सध्या खानापूर, तासगाव, मिरज या तालुक्‍यांसह अन्य भागात फळ छाटणीस प्रारंभ झाला आहे. 

शेतकऱ्यांनी गुणवत्ता राखली... 
पलूस तालुक्‍यात सर्वात शेवटी छाटण्या घेतल्या जात असल्या तरीही गेल्या चार वर्षात येथील शेतकऱ्यांनी गुणवत्ता राखली आहे. हंगामाच्या अखेरीसही येथील द्राक्ष युरोपसह अन्य देशात निर्यात होतात. येथील काही संस्था, शेतकरी गट निर्यातीसाठी पुढाकार घेतात. रासायनिक शेतीकडून सध्या सेंद्रीय शेतीकडे कल वाढतो आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grape pruning is completed on only 15 per cent