
आटपाडी परिसरात गेल्या तीन महिन्यापासून सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. आतापर्यंत 12 ते 13 चोऱ्या होऊनसुद्धा एकही चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे नागरिक व व्यापारी भयभीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
झरे : आटपाडी परिसरात गेल्या तीन महिन्यापासून सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. आतापर्यंत 12 ते 13 चोऱ्या होऊनसुद्धा एकही चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे नागरिक व व्यापारी भयभीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
टेंभूचे पाणी आल्यानंतर शेतकरी ऊस व द्राक्ष बागेकडे वळले आहेत. सध्या झरे परिसरामध्ये भरपूर प्रमाणात द्राक्ष बागा झाल्या आहेत. अनेक जणांच्या बागा फळावरती आहेत. तर आगाप धरलेल्या बागेची द्राक्ष विक्रीसाठी आली आहेत. शेतकऱ्यांनी अनेक व्यापाऱ्यांना संपर्क साधला परंतु व्यापाऱ्यांनी झरे परिसरातील द्राक्ष घेण्यास नकार दिला आहे.
द्राक्षे व्यापारी म्हणाले,""रात्री-अपरात्री गाडी भरण्यासाठी पाठवणार अचानक जर चोरट्यांनी गाडीवरती हल्ला केला तर त्याला जबाबदार कोण ? किंवा गाडी भरून जात असताना द्राक्षे लुटली तर त्याला जबाबदार कोण ? त्यामुळे आम्ही या परिसरामध्ये द्राक्षे घेऊ शकत नाही.''
शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून द्राक्ष बागा फुलवल्या आहेत. परंतु द्राक्ष घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असे दिसून येत आहे. अनेक वेळा,अनेक ठिकाणी चोऱ्या होऊन सुद्धा अद्याप पोलिसांना एकही चोर सापडू शकत नाही. पोलिस यंत्रणेने चोरांचा तत्काळ छडा लावण्याची गरज आहे. पोलिसांनी तपास जलद गतीने करून चोरांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दरवर्षी आम्ही द्राक्षे विकतो यापूर्वी आम्ही बेदाणा करत होतो. परंतु त्यासाठी खर्च वाढतो, त्रास वाढतो म्हणून द्राक्ष झाडावरच असताना आम्ही विकतो. परंतु यावर्षी चोरांच्या भीतीमुळे व्यापारी द्राक्ष खरेदी करण्यासाठी येईनात. त्यामुळे पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
- अधिक माने, द्राक्ष बागायतदार.
संपादन : प्रफुल्ल सुतार