Sangli : द्राक्षबागांना डाऊनी, घडकुजीचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grapes-Farming

Sangli : द्राक्षबागांना डाऊनी, घडकुजीचा धोका

तासगाव : सलग पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष हंगाम छाटणीपासून अडचणीत आला आहे. द्राक्षबागांवर डाऊनी मिलेड्यू आणि घडकुज होण्याची शक्यता असल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. पावसाने काढणीला आलेल्या खरिपाचे नुकसान होणार आहे. मात्र रब्बीच्या गहू, हरभरा पिकासाठी पोषक वातावरण आहे.

सलग तीन वर्षे द्राक्ष शेती अडचणीत आहे. या वर्षीच्या हंगामाची ऑक्टोबर छाटणी सुरू आहे. मात्र छाटण्या सुरू असतानाच सलग पाऊस पडत असल्याने हंगाम धोक्यात येतो की काय, असे चित्र दिसू लागले आहे. हंगामपूर्व आगाप फळ छाटणी केलेल्या द्राक्षबागांची पोंगा, विरळणी, फुलोरा, तर काही ठिकाणी डिपिंगची अवस्था आहे. दरम्यान डाऊनीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. सध्याचे ढगाळ हवामान व दोन दिवस पावसाने झोडपल्याने द्राक्षबागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव शक्यता वाढली आहे.

काही ठिकाणी डाउनीचा हल्ला झाला आहे. छाटणी न झालेल्या द्राक्षबागांमध्ये पाणी साचून राहिल्याने काडीतील घड जिरण्याचा धोका आहे. एकूणच, सुरवातीपासूनच अडचणी सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. द्राक्षशेती ही हवामानाला संवेदनशील असल्याने हवामानातील थोडा बदलही द्राक्षपिकावर परिणाम करत असतो. त्यातच ऐन छाटणीत पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या जीवावर उठला आहे. याशिवाय अजून काही दिवस पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

परतीचा पाऊस द्राक्षशेती आणि खरीप पिकाला नुकसानदायक असला तरी रब्बी पिकाला पोषक आहे. गहू, हरभरा शाळू पिकासाठी हा पाऊस लाभदायक असल्याने कोरडवाहू शेतकरी मात्र खूश आहेत.

द्राक्षबागांवरील डाऊनी रोगावर बाजारात विविध कंपन्यांची अनेक औषध उत्पादने आहेत. त्यांच्या किमतीही भरमसाठ आहेत. मात्र काही ठराविक कंपन्यांची औषधेच या रोगावर परिणाम करतात. दरम्यान, काही कंपन्यांची महागडी औषधे फवारूनही परिणाम शून्य येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. अनेक बनावट कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे.

- नितीन तारळेकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सावळज