रोकडटंचाईमुळे द्राक्ष हंगाम धोक्‍यात

- रवींद्र माने
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

दर कोसळला - जिल्ह्यातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प होण्याच्या मार्गावर
या वर्षीचा द्राक्ष हंगाम सुरू झाला असून, हंगामाच्या सुरवातीलाच ‘रोकडटंचाई’चा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. द्राक्ष दलालांकडून चेक दिले जात आहेत, तर द्राक्ष बागायतदारांकडून रोख रकमेचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे गतवर्षीचा ३०० रुपयांचा दर २०० रुपयांवर कोसळला आहे. यावर्षीच्या या कृत्रिम संकटाला कसे सामोरे जायचे, याची चिंता द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना सतावू लागली असून, द्राक्ष हंगाम अडचणीत सापडला आहे. 

दर कोसळला - जिल्ह्यातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प होण्याच्या मार्गावर
या वर्षीचा द्राक्ष हंगाम सुरू झाला असून, हंगामाच्या सुरवातीलाच ‘रोकडटंचाई’चा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. द्राक्ष दलालांकडून चेक दिले जात आहेत, तर द्राक्ष बागायतदारांकडून रोख रकमेचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे गतवर्षीचा ३०० रुपयांचा दर २०० रुपयांवर कोसळला आहे. यावर्षीच्या या कृत्रिम संकटाला कसे सामोरे जायचे, याची चिंता द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना सतावू लागली असून, द्राक्ष हंगाम अडचणीत सापडला आहे. 

द्राक्ष बागायतदारांना लहरी हवामानामुळे दरवर्षी अस्मानी संकटाशी सामना करणे सवयीचे झाले आहे. मात्र, यावर्षी रोकडटंचाईच्या संकटाशी कसा सामना करायचा, हा प्रश्‍न आ वासून उभा आहे. दरवर्षी अवघ्या चार महिन्यांमध्ये जिल्ह्यात हजारो कोटींची उलाढाल द्राक्ष खरेदी-विक्रीच्या माध्यमातून होत असते. यावर्षीचा हंगाम सुरू झाला आहे; मात्र रोकडटंचाईमुळे पूर्ण द्राक्ष उद्योग धोक्‍यात आला आहे. सुरवातीलाच द्राक्षांच्या कोसळलेल्या दरामुळे संत्री, डाळिंब, कांदा, भाजीपाला या पाठोपाठ द्राक्ष पिकालाही या रोकडटंचाईचा फटका बसण्याची शक्‍यता अधोरेखित झाली आहे.

दलालांनी दर पाडले..
बाजारात पैसे नसल्याने ग्राहक नसल्याचे कारण सांगत हंगामाच्या सुरवातीपासूनच दलालांनी दर पाडण्यास सुरवात केली आहे. द्राक्ष दलालांकडे रोख रकमा नाहीत! त्यांच्या बॅंकेत पैसे आहेत की नाहीत हे माहिती नाही! त्यामुळे दलालांकडून चेक घेताना मोठी रिस्क शेतकऱ्यांना पत्करावी लागत आहे. त्यापेक्षा १० टक्‍के कमी रक्‍कम द्या; पण रोख रक्‍कम द्या, असा आग्रह शेतकरी धरताना दिसत आहेत.

उधारी कशी चुकती करायची?
रोख रक्‍कम न मिळाल्यास, बॅंकांतून पैसे मिळत नसल्याने मजुरांना मजुरी कशी द्यायची, खर्च कसे भागवायचे, खते, औषधे उधारीवर आणली आहेत त्यांचे पैसे कसे चुकते करायचे, असे प्रश्‍न भेडसावत आहेत. पुढील दोन महिन्यांत हे प्रश्‍न आणखी बिकट होणार आहेत.

यावर्षी कधी नव्हे ते द्राक्ष पीक उत्तम आले आहे. चार पैसे मिळण्याची अपेक्षा वाटत असतानाच दर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यासमोर आणखी मोठी अडचण येऊ घातली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

यंदा १ लाख टनांचे उत्पादन
तासगाव तालुक्‍यात १५ हजार एकर क्षेत्रात द्राक्ष पीक घेतले जाते. एकरी १० टन सरासरी पीक गृहीत धरल्यास १ लाख टनांवर उत्पादन या वर्षी अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी ३०० रुपये दर
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नाताळच्या पार्श्‍वभूमीवर २८० ते ३०० रुपये पेटी असा दर शेतकऱ्यांना मिळाला होता. तोच दर आज हंगामाच्या सुरवातीलाच १७० ते २०० रुपयांवर कोसळल्याने यावर्षीच्या द्राक्ष संकटाची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. 

यंदा २२० रुपये दर
द्राक्षाला सध्या सोनाकाचा दर १८० ते २२०, तर काळ्या द्राक्षांचा शरद, सरिता यांचा दर २८० ते ३०० रुपये चार किलो असा दर मिळत आहे. गतवर्षी हेच दर यापेक्षा ३० टक्‍के अधिक होते. बाजारपेठेत ग्राहक नसल्याचे कारण सध्या सांगितले जात आहे.

द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी काळजी घेऊन व्यवहार करावेत. द्राक्ष बागायतदार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत एक ॲक्‍शन प्लॅन तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. द्राक्ष बागायतदारांनी दलालाच्या बॅंक अकाउंटची माहिती घेऊन, ॲडव्हान्स घेऊन व्यवहार करावेत. 
- सुभाष आर्वे, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ

कॅशलेस निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बॅंकेत पैसे आहेत; पण मजुरांना मजुरी देणे, औषधे, खते आणणे मुश्‍कील झाले आहे. आता द्राक्षे विक्रीनंतरही पैसे चेकने घेतल्यास बॅंकेतून पैसे मिळत नाहीत, अशी अडचण निर्माण झाली आहे. 
- प्रताप जाधव, द्राक्ष बागायतदार शेतकरी

द्राक्ष शेतकऱ्यांची एक बैठक बाजार समितीने घेतली आहे. त्यांची फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष दलालांची नोंदणी प्रत्येक पोलिस ठाण्यात केली जावी. शेतकऱ्यांनी उधारीवर द्राक्षे न देता बॅंक अकाउंटवर अथवा रोखीने व्यवहार करावेत.
- अविनाश पाटील, सभापती, तासगाव बाजार समिती 

द्राक्ष व्यवसाय दृष्टिक्षेपात
जिल्ह्यात १८ हजार १०६ हेक्‍टरवर द्राक्ष पीक 
तासगाव तालुक्‍यात ३०० कोटींहून अधिक द्राक्ष उत्पादन
एकरी १२ टनांवर उत्पादन घेणारे शेतकरी
जिल्ह्यात ४० टक्‍के द्राक्षांचा बेदाणा  
द्राक्ष निर्यात १० टक्‍के  
देशभरात ५० टक्‍के द्राक्षे विक्रीसाठी 

Web Title: grapes season danger by currency shortage