काळ्या मातीत हवा ‘यलो पॅटर्न’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Turmeric

काळ्या मातीत हवा ‘यलो पॅटर्न’

सांगली - हळद हा शेतमालच असून, त्यावर जीएसटी आकारता येणार नाही, असा निर्णय झाला आणि त्याचे जिल्ह्यात स्वागतही झाले. सांगली ही हळदीची प्रमुख उतारपेठ आहे. जिल्ह्यात हळद पिकते कमी; परंतु ही आता हळदीला प्रमुख पीक म्हणून पुढे आणण्याची मोठी संधी आहे. द्राक्ष, ऊस या प्रमुख पिकांभोवती बाजारपेठेतील अस्थिरता, लहरी हवामान याचा चक्रव्यूह पडला आहे. तुलनेत हळदीचे पीक फायद्याचे आणि तांत्रिक सल्ला घेऊन केल्यास कमी धोक्याचे आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या पीक पॅटर्नची फेररचना करण्याचा संकल्प केला आहे. त्यात हळदीला प्राधान्य मिळावे. केवळ इमारती पिवळ्या रंगाने रंगवून ‘यलो सिटी’ करण्यापेक्षा काळ्या मातीत ‘यलो पॅटर्न’ राबवावा लागेल.

उतारपेठ, प्रक्रिया उद्योग मोठे

सांगली ही पश्‍चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी उतारपेठ आहे. येथे कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यातून येणारा शेतमाल उतरवला जातो. त्यातील हळद, मका आदी पिकांवर येथे प्रक्रिया केली जाते. हळद पावडर हा प्रमुख उद्योग येथे चालतो. त्याचा फायदा अडते, व्यापाऱ्यांना अधिक आहे. हळद नगरी म्हणून शेतकऱ्यांच्या पदरात काय आहे? आता जो काही जीएसटीचा निर्णय झाला त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना कमीच आहे. शेतकरी हळद उत्पादक होण्यासाठीच्या प्रयत्नांना आता गती द्यावी लागेल. वरवरच्या उपायांनी काहीच होणार नाही.

१० रुपयांत जी.आय. मानांकन

सांगलीच्या हळदीला जी.आय. मानांकन मिळाले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. कृषी विभागाने त्यासाठी नियोजन केले आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी सांगितले. जी. आय. मानांकनासाठी गेल्यावर्षी २५० शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यासाठी अवघा १० रुपयांचा खर्च आहे. या मानांकनाच्या आधारे बाजारात उतरलो तर अधिक दर मिळेल आणि अधिकचा नफा पदरात पडेल, असे आवाहन कृषी विभागाने केले.

परदेशात ७० टक्के हळद कॉस्मेटिकसाठी

जगाच्या बाजारात सौंदर्य प्रसाधनांना प्रचंड मागणी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतीय हळदीला अधिक पसंती आहे. सुमारे ७० टक्के भारतीय हळद ही सौंदर्य प्रसाधनांसाठी वापरली जाते, असा एक अहवाल आहे. याशिवाय, औषधी वापर अधिक आहेच. त्याचा फायदा सांगलीने घेतला पाहिजे. निर्यातीत महाराष्ट्राचे स्थान देशात दुसरे आहे, सांगलीला या यादीत पुढे सरकण्याची संधी आहे. जगात ‘सांगली हळद’ हा ब्रॅंड रुजवण्याची ही सुरुवात ठरू शकते. त्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक अंश विरहीत पीक उत्पादन घ्यावे लागेल.

‘कृषी’चे प्रयत्न

कृषी विभागाने यावर्षी बीजीएस योजनेतून प्रत्येकी १०० एकरांचे दोन क्षेत्र हळद पीक विकासाचे नियोजन केले आहे. त्यात सेलम, काडाप्पा आणि बीएसआर-२ या जाती पिकवल्या जातील.

उत्पादनात राज्यात सांगली जिल्हा अकरावा

महाराष्ट्रात हळद पिकवणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत सांगलीचे स्थान अकरावे म्हणजे बरेच खालचे आहे. जिल्ह्यात ७७४ हेक्टर क्षेत्रावर हळद पीक घेतले जाते. पहिल्या क्रमांकावर हिंगोली असून, तेथे ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळदीचे पीक घेतले जाते. नांदेड दुसऱ्या क्रमांक (१३ हजार १३१ हेक्टर), वाशिम (४ हजार १४९) हे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.

उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

देशातील १९ राज्यांत हळद पिकवली जाते. त्यात तेलंगाना राज्य पहिल्या स्थानावर असून, तेथील ५६ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रावर हळद पीक घेतले जाते. तेथील उत्पन्न २ लाख ९५ हजार ६७५ टन इतके आहे. महाराष्ट्रात ५४ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावर हळद घेतली जाते. ११ लाख १२ हजार टन हळदीचे उत्पादन महाराष्ट्रात होते.

  • जीएसटी उठली, शेतकऱ्यांना फायदा काय?

  • हळद प्रमुख पीक म्हणून पुढे आणण्याची संधी

  • हळद विकणारी सांगली, पिकवण्यात राज्यात अकरावी

  • सेंद्रिय हळद पिकवण्यासाठी प्रयत्न अपुरेच

  • बाजार समिती फक्त ‘सेस’ जमवण्यापुरतीच का?

Web Title: Great Opportunity To Promote Turmeric As Major Crop In Sangli District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top