इराण, टांझानियातून आलेल्यांचा जामखेडच्या मशिदीत सामूहीक नमाज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

काल (बुधवार) रात्री साडेआठच्या सुमारास 14 जण नमाजपठन करताना आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मशिदीच्या तीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

जामखेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभर संचारबंदी आहे. मात्र, जामखेडमध्ये त्याचे उल्लंघन करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्या नमाज पठणात टांझानिया, इराण, आयव्हरी कोस्ट या देशातील नऊ व्यक्ती सामील झाल्या होत्या.

जामखेड शहरातील काझी गल्लीतील मशिदीत त्यांनी हे नमाजपठण केले आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. नमाजपठणासाठी जमलेल्या 14 मधील 9 जण परदेशातून आलेले असल्याने प्रशासन हादरले आहे. 

याबाबत कॉन्स्टेबल संदीप आजबे यांनी फिर्याद दिली. काझी गल्लीतील मशिदीत नमाजपठनासाठी 14 जण जमले होते. शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, काल (बुधवार) रात्री साडेआठच्या सुमारास 14 जण नमाजपठन करताना आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मशिदीच्या तीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

नमाज पठनासाठी उपस्थित 14 जणांमध्ये आयव्हरी कोस्ट येथील पाच, टांझानियाचे तिघे, इराणमधील एकाचा, तसेच तमिळनाडू व मुंबई येथील प्रत्येकी एकाचा समावेश होता. या सर्वांना ताब्यात घेऊन नगरला जिल्हा रुग्णालयात हलविल्याची माहिती मिळाली. 

आखाती देशामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात आहे. तेथील लोकांमुळे नगरमधील डॉक्टरांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे प्रशासन धास्तावले आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींनी अगोदर तपासणी करून घ्यावी किंवा होम क्वॉरंटाईन व्हावं असा आदेश असताना जामखेडमध्ये तो धुडकावून लावण्यात आला. वारंवार सूचना देऊनही लोकांकडून असे उल्लंघन होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Group namajs in Jamkhed