गुरगुरणारा बिबट्या बनला हिंसक; शेतात कसं जावं, घरी कसं रहावं

शिवाजीराव चौगुले
Wednesday, 24 February 2021

गुरगुरणारा बिबट्या आता नरभक्षक बनल्याने "शेतात जायचं कसं', असा प्रश्न या परिसतील शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.

शिराळा : तडवळे (ता. शिराळा, जि. सांगली) येथील ऊस मजुराच्या मुलावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याने तालुका हादरुन गेला आहे. तालुक्‍यात गुरगुरणारा बिबट्या आता नरभक्षक बनल्याने "शेतात जायचं कसं', असा प्रश्न या परिसतील शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्तासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

बिबट्याच्या मुक्त संचारामुळे लहान मुलांचाही जीव धोक्‍यात आला आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या या बिबट्यांची मजल आता मानवावर हल्ला करण्यापर्यंत गेल्याने तालुक्‍यातील वाडी वस्तीवर भीतीचे वातावरण पसरले आहे. 

चांदोली राष्ट्रीय उद्यानापेक्षा शिराळा तालुक्‍यातील अनेक गावात बिबट्याचा वावर वाढल्याने लोक अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत वावरू लागलेत. उसाचे वाढते क्षेत्र व जंगल हेच बिबट्याच्या निवाऱ्याचे प्रमुख ठिकाण बनले आहे. ऊस तोडणी मजुरांसाठी उसाचा निवाराच घातक बनला आहे. उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झाडाच्या सावलीला ठेवलेल्या एक वर्षाच्या सुफीयानला पळवून नेले. 

चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा वावर कायमचाच आहे. शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असल्याने बिबट्याला राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. आता उसाचे क्षेत्र वाढल्याने त्याच्यासाठी गावोगावी मिनी जंगल तयार झाले आहे. त्याला ससे व डुक्कर हे चांगले खाद्य मिळू लागले आहे. रहायला सुरक्षित जागा व खायला पुरेशे अन्न व प्यायला वारणा व मोरणा नदीसह व पाझर तलावातील पाणी मिळत आहे. त्याला पुन्हा उद्यानात जाण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे बिबट्याने गावोगावी वास्तव्य निर्माण केले आहे.

वन्य व पाळीव प्राण्यावर हल्ला करणारा बिबट्या आता माणसावर हल्ले करू लागला आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 
पश्‍चिम घाट पट्ट्यात बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक बिबटे जंगल सोडून बाहेर पडत आहेत. त्यांना बाहेर लपण्यासाठी वाढते ऊस क्षेत्र व जंगल मिळत आहे. ससे व डुक्कर खायला मिळत आहे. त्यांना अन्नाची कमतरता भासत नाही. बिबट्या सर्व वातावरणात राहू शकतो. तो ज्या भागात फिरतो त्याच भागात कायम राहतो. अन्नासाठी भटकत राहतो. 
तडवळे परिसरात बिबट्याचा वावर कायमचा आढळून आला आहे. ऊस तोडणी मजुराच्या मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे शेतात जाणाऱ्यांच्यातही भीत निर्माण झाली आहे. 

जनावरांसह प्रवाशांवर हल्ले 

बिबट्याने आत्तापर्यंत शिराळा तालुक्‍यातील मांगरूळ, बिळाशी, वाकुर्डे, येळापुर, कुसाईवाडी, मांगले, मिरुखेवाडी, बेरडेवाडी, निगडी, शिराळा, मोरणा धरण, कांदे, कापरी, रेड आदी परिसरातील पाळीव प्राण्यावर हल्ले करून ठार मारले आहे. दोन वर्षी गोरक्षनाथ मंदिराजवळील बाह्य वळण रस्त्यावर बिबट्याने मोटारसायकलवर उडी मारून शिराळा येथील अभिजित कुरणेच्या पायावर पंजा मारून जखमी केले होते. आठ महिन्यापूर्वी चरण येथील युवक व नंतर मांगले येथील युवकावर हल्ला झाला होता. 
जूनमध्ये घागरेवाडी येथे जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या व चार महिन्यांपूर्वी मांगले येथे बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. 

बिबट्याची पुढची पिढी उसातच 

काही बिबटे अन्नाच्या शोधत बाहेर पडले ते बाहेरच राहिले आहेत. त्यांचा वावर चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून 60 कि. मी. अंतरापर्यंतच्या भागात सुरू आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्या त्या परिसरातच जन्ल आहेत. त्यामुळे त्या आता ऊसपिकांच्या शेतातच फिरत आहे. तिथे त्यांच्या अन्न साखळीत अडथळे निर्माण झाल्याने त्यांचे हल्ले मानवी वस्तीवरील जनावरे आणि माणसांवर सुरू झाले आहेत. 

बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रासाठी 

 • रात्री शेतात जाताना बॅटरी अथवा घुंगराची काठी हवी.
 •  मोबाईल, रेडिओवर गाणी लावावीत. चाहूल लागून तो मार्ग बदलतो.
 • अंगण वा उघड्यावर झोपू नये. उघड्यावर शौचाला जाऊ नये. झाडीजवळ सावध असावे.
 • घराजवळ ऊस लावू नये. ऊस व घरात कमीत कमी 25 फुटाचे अंतर असावे. 
 • मुलांना एकटे अंगण अथवा शाळेत पाठवू नये. समूहाने जा - ये करावी.
 • अंगणाभोवती कुंपण असावे. पाळीव जनावरे गोठ्यात बंदिस्त ठेवावीत.
 • घर, गावाच्या परिसरात घाण कचरा टाकू नये जेणेकरून डुक्कर, उंदरांचा वावर राहणार नाही. 
 • आपले खाद्य म्हणून बिबट्या येऊ शकतो. 
 • बिबट्याचा पाठलाग करू नये, तो प्रती हल्ला करतो. 
 • शेतकरी व उसतोड मजुरांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
 • बिबट्या दिसल्यास गोंधळ न करता वन विभागाशी संपर्क साधावा.

संपादन : युवराज यादव 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: The growling leopard became violent; How to go to the farm, how to stay at home