सोयाबीन खरेदीचा हमीभाव आहे 3 हजार 880 रुपये...हाती पडतात 3 हजार 200 रुपयेच

शामराव गावडे
Wednesday, 7 October 2020

नवेखेड(जि. सांगली)-  सोयाबीन खरेदीचा शासनाचा हमीभाव आहे 3 हजार 880 रुपये. परंतु शेतकऱ्यांच्या हाती पडतात 3 हजार ते 3 हजार 200 रुपयेच. शासनाचे एकही हमीभाव केंद्र जिल्ह्यात नाही. खासगी व्यापारी सोयाबीन खरेदी केंद्रांतून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण आणावे अशी मागणी होत आहे. 

नवेखेड(जि. सांगली)-  सोयाबीन खरेदीचा शासनाचा हमीभाव आहे 3 हजार 880 रुपये. परंतु शेतकऱ्यांच्या हाती पडतात 3 हजार ते 3 हजार 200 रुपयेच. शासनाचे एकही हमीभाव केंद्र जिल्ह्यात नाही. खासगी व्यापारी सोयाबीन खरेदी केंद्रांतून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण आणावे अशी मागणी होत आहे. 

सोयाबीन नगदी पीक म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात खरीप पेरणीबरोबरच ऊसपट्ट्यात आंतरपीक म्हणून सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. एकरी 12 पासून 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे पट्टीचे शेतकरी आहेत. 
शासनाने यंदा सोयाबनिला 3 हजार 880 रुपये प्रति क्विंटल खरेदीचा दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले. वास्तव मात्र वेगळे आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांनी नाफेडकडे जिल्ह्यातील बाजार समिती कार्यक्षेत्रात हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली होती. पण त्यांना ती परवानगी आजअखेर मिळालेली नाही. शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्या अशा सूचना आहेत. परंतु कोणतीही वेबसाईट वा अन्य काही माहिती बाजा समित्यांकडे नाही. खासगी व्यापाऱ्यांनी मात्र आपलेउखळ पांढरे करून घेतले आहे. आद्रतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. 18 आर्द्रतेला जवळपास 12 किलोची तूट धरली जाते. 

पश्‍चिम महाराष्ट्रात सोयाबीनवर प्रक्रिया करणारे तीन मोठे कारखाने आहेत. हे कारखाने व्यापाऱ्यांशी संधान बांधून अमूक दरापर्यंत तुमचा माल घेतो, अशी हमी देतात. त्यानुसार व्यापारी मधल्या मार्जिनवर शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करतात. सोयाबीनमधील आर्द्रता, माती, डागी असे करून प्रति किलो 12 ते 14 किलोपर्यंत तूट धरली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात 3 हजार ते 3 हजार 200 रूपये इतकीच रक्कम मिळते. 

काही शेतकऱ्यांना अपवादात्मक स्थितीत आर्द्रता कमी असेल तर 100 ते 200 रुपये जादा मिळतात. काही ठिकाणी वजन काटे सदोष आहेत. त्याठिकाणी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. सोयाबीन हंगामाआधी त्या काट्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. वास्तविक हमीभाव जाहीर झाला. परंतु खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. प्रबोधनाच्या पातळीवर शासकीय यंत्रणा कमी पडली. बाजार समित्यांचे हात कायद्याने बांधले गेले असल्याने या बाजार समिती कारखान्याकडून दंड आकारू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. 

बेस 3 हजार 880 हवा 

वास्तविक 3 हजार 880 रुपयांचा बेस धरून खासगी व्यापाऱ्यांनी माल खरेदी करावा एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. माती, डागी याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. 

 

सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्र मिळावे म्हणून नाफेडकडे अर्ज केले आहेत. परंतु अद्यापही त्याची परवानगी मिळालेली नाही. 

-विजय कुमार जाधव 
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर. 

 

3 हजार 880 रुपये बेस धरून खासगी व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदी करावे. अन्यथा त्यांचा विक्री परवाना रद्द करावा. वजन काट्यांची तपासणी व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहील. 
-भागवत जाधव, 

अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाळवा तालुका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The guaranteed price for buying soybeans is 3 thousand 880 rupees. only 3 thousand 200 rupees are available