पालकमंत्री नावापुरतेच...सेना उसनवारीवर !

विशाल पाटील
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

दोन मतदारसंघांत अंगण "धनुष्या'चे, फुललंय "कमळ'

सातारा : एकेकाळी खासदार, आमदारकी मिळवून दिलेल्या शिवसेनेची यंदाच्या निवडणुकीत पुरती वाताहत झाली आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी पालकमंत्रिपद भूषवूनही पाच वर्षांत स्वत:चे उमेदवारही शिवसेनेला उभे करता आले नाहीत. शिवाय, उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांचेही "आयजीच्या जिवावर...' असा प्रकार असल्याने पाटण वगळता जिल्ह्यात सेनेची पिछेहाट झाली आहे. 
 

सातारा जिल्ह्यात शिवसेनेतून हिंदूराव नाईक-निंबाळकर हे खासदार, तर सदाशिव सपकाळ हे जावळीतून आमदार झाले होते. त्यातून पाटणमधून शंभूराज देसाई यांनीही खिंड लढविली आहे. डरकाळ्या फोडणाऱ्या शिवसेनेला "अच्छे दिन' आणण्यासाठी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. मात्र, त्यांची मधूनअधून होणारी "वारी' केवळ प्रशासकीय माहिती "संकलना'पुरतीच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. 

मोठमोठ्या आणाभाका मारणाऱ्या शिवतारे यांनी अनेकदा घराघरांत शिवसेनेचे चिन्ह पोचविले असल्याचे अनेक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सांगितले. "15 वर्षांत मागील पालकमंत्र्यांनी केले नाही, ते मी करत आहे,' "राष्ट्रवादीला हटविणार', अशा राणाभीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या पालकमंत्र्यांना मात्र, जिल्ह्यात शिवसेना वाढविता आलीच नाही. मुलूखमैदानी तोफ असलेल्या नितीन बानुगडे-पाटील यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे उपनेतेपद देवून सातारा, सांगलीचे संपर्कप्रमुख म्हणूनही जबाबदारी दिली. मात्र, त्यांना त्यांच्याच कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात उसनवारीने उमेदवार आणावा लागला आहे. गत निवडणुकीतही साताऱ्यातून उमेदवार आयात करावा लागला होता. राज्यभर नेते म्हणून मिरवणाऱ्यांनी स्वत:च्या "घरा'ची मेढही भक्‍कम रोवता आली नाही, अशी टीका शिवसैनिक करत आहेत. कऱ्हाड उत्तरबरोबर कोरेगाव तालुक्‍यातही शिवसेनेने उमेदवार उसनवारीच मिळविला आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत ही परिस्थिती होती. शिवसेनेच्या भात्यात भाजपचे कमळ फुलत असल्याची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. केवळ पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. 
 

उद्योगांच्या आणाभाकाच 

"जागा द्या, मोठे उद्योग लगेच आणतो,' अशी ग्वाही 2015 मध्ये देणाऱ्या पालकमंत्र्यांनी कोणते उद्योग आणले, हा प्रश्‍नच आहे. यवतेश्‍वर ते कास पठारापर्यंतच्या बेकायदेशीर बांधकामावर "बुलडोझर' फिरविणार, असे अनेकदा शिवतारेंनी सांगितले. मात्र, तोही बुलडोझर कोठे गायब आहे, हेच सातारवासीयांना कळेना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister remain only for the sake of name