रयत क्रांतीने उभारली गुढी, कृषी बिलाचे केले जोरदार समर्थन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी बिलाचे रयत क्रांती संघटनेने जोरदार समर्थन करत आज गावोगावी शिवारात गुढी उभारण्याचे आंदोलन केले. या बिलाला विरोध करणाऱ्यांना आव्हान देत हे आंदोलन झाले. माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी या विरोधी आंदोलनाला छेद देण्यासाठी आज शिवारात गुढी उभारण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता.

सांगली ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी बिलाचे रयत क्रांती संघटनेने जोरदार समर्थन करत आज गावोगावी शिवारात गुढी उभारण्याचे आंदोलन केले. या बिलाला विरोध करणाऱ्यांना आव्हान देत हे आंदोलन झाले. माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी या विरोधी आंदोलनाला छेद देण्यासाठी आज शिवारात गुढी उभारण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. 

प्रत्येक गावात एक गुढी असे त्यांनी ठरवले होते. त्यांच्या होम पिचवर वाळवा तालुक्‍यात आष्टा येथे राकेश भोसले यांच्या शेतात गुढी उभारली. सदाभाऊ खोत यांनी स्वतः पुण्यात आंदोलन केले. सोरतापवाडी (ता. हवेली) येथे त्यांनी गुढी उभी करून पाठिंबा दिला. ते म्हणाले, ""आम्ही आज विजयी रॅली काढली आणि शेतकरी स्वतंत्र झाल्याची गुढी उभी केली. शेतमालाला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करणारा कायदा करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मुक्त केले आहे.'' 

जिल्हाध्यक्ष विनायक जाधव म्हणाले, ""हा कायदा शेतकरी हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या मोदी सरकारने तोडल्या आहेत. यातून शेतकऱ्यांचे कल्याणच होणार आहे. हा आनंदाचा क्षण आहे. तो आम्ही गुढी उभारून साजरा करतोय.'' 

अरुण गावडे, पांडुरंग बसुगडे, नागनाथ सिसाळे, शशिकांत शेळके, महेश माने, राकेश भोसले, गणेश बाबर, विशाल जाधव, सागर पाटील, रघुनाथ खोत, स्वप्नील टोपकर, सुजय माने, गणेश कुंभार,गणेश जाधव, गौरव माने, संदीप जाधव, तानाजी जगताप, दादा मेंगाने, शशिकांत पाटील, संभाजी पाटील, शिवाजीराव भोसले, महादेव घारे, रोहन बाबर, प्रताप खाडे, तानाजी जाधव उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gudi raised by the Rayat kranti, strongly supported the agricultural bill