'गूळं' काढण्याची प्रथा; टिक्केवाडीकर ग्रामस्थ घरेदारे सोडून शेतशिवारात राहावयास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tikkewadi People

अनेक वर्षापासून सुरू असलेली गूळं काढण्याची प्रथा जोपासण्यासाठी टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थ घरेदारे सोडून शेतशिवारात राहावयास गेलेत.

'गूळं' काढण्याची प्रथा; टिक्केवाडीकर ग्रामस्थ घरेदारे सोडून शेतशिवारात राहावयास

कोनवडे - अनेक वर्षापासून सुरू असलेली गूळं (Gul) काढण्याची प्रथा (Culture) जोपासण्यासाठी टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थ (Public) घरेदारे सोडून शेतशिवारात (Farm) राहावयास गेलेत. मुक्त जीवनशैलीचा अवलंब करून निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने रोगराईपासून मुक्तता होते. अशी पारंपरिक  कल्पना आजही येथील ग्रामस्थ जोपासतात. आज आपण विज्ञान युगात वावरत असलो तरी  ग्रामीण भागात जुन्या रितीरिवाजांना सांभाळणारी मंडळीही पाहावयास मिळत आहेत.

भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी येथे ‘गूळं’ काढण्याची प्रथा पिढ्यान पिढ्या सुरू आहे. ही प्रथा श्रद्धा की अंधश्रद्धा हा वाद निर्माण करणारी असली तरी ग्रामस्थांच्या मते, या प्रथेमुळे गावची एकजूट व आरोग्य टिकण्यास मदत होते.

निसर्गाच्या कुशीत वसलेलं ‘टिक्केवाडी’ हे गाव. भुजाईदेवी हे या गावचे ग्रामदैवत. देवीवर नितांत श्रद्धा असणारे.. इथले ग्रामस्थ दर तीन वर्षाला ‘गूळं’ काढतात... 'गूळं' काढणे म्हणजे घरामध्ये कुणीही राहायचं नाही...सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात राहायचं...

हेही वाचा: बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी ९२७ कोटी; शेतकऱ्यांचा मात्र विरोध

माघवारीनंतर येणार्‍या पौर्णिमेपासून ही गुळं काढली जातात. या प्रथेमुळं जाती-पातीची बंधने गळून पडतात. याशिवाय सादर होणार्‍या लोककलेतून चैतन्य फुलतं. सामाजिक समतेला पूरक ठरणारी ही प्रथा आहे. टिक्केवाडीकर देवीचे नाव मुखात ठेवत मुक्त जीवनशैलीचा आनंद लुटत आहेत. राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली आहेत त्याला ही मंडळी ‘गूळं’ म्हणतात. गावात शुकशुकाट असला तरी इथली शाळा मात्र सुरू आहे. इथल्या प्रत्येक घरामध्ये पदवीधर झालेली एक तरी व्यक्ती आढळते; पण या प्रथेला ही सुशिक्षित मंडळी अंधश्रद्धा समजत नाहीत. दिवसभर शिणलेले जीव रात्री शाहिरी, ओव्या, गीते, भजन आदी कलांमध्ये रमून जातात. विशेष म्हणजे बाहेरचे पै-पाहुणे एक-दोन दिवस गुळ्यात राहण्यासाठी आवर्जून येतात.

पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेमागे गावकर्‍यांच्या भावना दडलेल्या आहेत. भुजाईदेवी गावकर्‍यांचे संरक्षण करते, ही इथल्या लोकांची श्रद्धा आहे. देवीला कौल लावून गावकरी ‘गूळं’ काढतात आणि पुन्हा कौल दिला की आपापल्या घरी परतात. पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचावाडा, बसुदेवाचा वाडा, हंड्याचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते; पण अलीकडे ही प्रथा शेतशिवारात पाळत आहेत. प्रथेदरम्यान संपूर्ण गावात चिटपाखरूही नसते. या काळात घरात झाडलोट करणे, चूल पेटवणे, जेवण बनवणे, दिवा पेटवणे व घराला कुलूप लावणे अशा गोष्टी वर्ज्य मानल्या जातात; पण यावेळी चोरीसारखे हीन प्रकार अजिबात होत नाहीत. तर शिवारात २५ ते ३० कुटुंबासाठी एकच पालं उभारले जाते. संपूर्ण पालातील लोक रात्री एकाच पंक्तीला बसून सहभोजनाचा आनंद घेतात. टिक्केवाडी ग्रामस्थांच्या या अनोख्या प्रथेची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

Web Title: Gul Culture Tikkewadikar People Stay In Farm

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :cultureFarm
go to top