शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू: आर्किड, गार्नेशिया, गुलाब फुलांना मिळाला चांगलाच दर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

विदेशातील आयात थांबल्यानंतर देशांतर्गत बाजारात मोठा उठाव झाला आणि फुलांना उच्चांकी दर मिळाला.

सांगली: आर्किंड... एक फूल 40 रुपयांना... जर्बेरा... एक फूल 7 ते 9 रुपयांना... गार्नेशिया... एक फूल 20 रुपयांना... हे सुखद धक्का देणारं होतं. फुलांना एवढा दर मिळेल, अशी अपेक्षाच उत्पादकांना नव्हती. कोरोना संकटानं मारलं होतं, त्यातून तारून नेलं तेही कोरोनानंच. विदेशातील आयात थांबल्यानंतर देशांतर्गत बाजारात मोठा उठाव झाला आणि फुलांना उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील हरितगृहातील फूल उत्पादकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. 

थायलंड हा जगातील सर्वात मोठा आणि नैसर्गिक पद्धतीने जागतिक फुले पिकवणारा देश आहे. तेथे आर्किड, गार्नेशिया, जर्बेरा फुलांची शेती तेथे शेडनेट छताखाली केली जाते. त्यामुळे भारतीय तुलनेत तेथे उत्पादन खर्च कमी आहे. ती फुले जगभर निर्यात होतात. भारतात त्यांची आयात कोरोना संकटानंतर थांबली. त्याचवेळी भारतीय बड्या उत्पादकांनी कोरोना संकट कधी संपेल, याचा अंदाज नसल्याने या फुलांची शेतीच थांबवली. त्यावरील खर्च कमी केला. सहाजिकच, देशात फुलांची मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ चुकला. ज्यांनी संकटातही फुले जगवली, त्यांच्या हाती चांगले यश आले. 

हेही वाचा- चपलांच्या दुकानाला आग: कापडाने घेतला पेट आणि बघता बघता सम्पूर्ण दुकान झाले खाक -

मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु होण्याआधी आर्किड फुलांचा दर 10 ते 12 रुपयांना एक, इतका होता. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर 2 ते 3 रुपयांनाही कुणी ते घेईना. कोरोना पश्‍चात बाजारपेठ सुरु झाली, लग्नसराईचा धुमधडाका सुरु झाला आणि दर उच्चांकी 800 रुपयांना बंच म्हणजे 40 रुपयांना एक फूल इतका झाला. तो आता 25 रुपयांवर येऊन स्थिरावला आहे. विदेशातील फुलांची आवक काही प्रमाणात सुरु झाली आहे. सध्या जिल्ह्यात दहा ते बारा लोकच उत्पादन घेतात. सध्या जर्बेरा 150 ते 180 रुपयांना बंच म्हणजे 7 ते 9 रुपयांना एक आहे. कार्नेशियन 450 रुपयांना बंच म्हणजे 20 रुपयांवर एक फुल इतका उच्चांकी दर मिळाला. गुलाबाचा दरही 400 रुपयांवर पोहचला होता. 
 

कोरोना लॉकडाऊनमध्ये फूल उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले, त्यातूनही ज्यांनी धिराने उत्पादन चालू ठेवले, त्यांच्यासाठी हा काळ सुखद आहे. फुलांना विक्रमी दर मिळतो आहे. दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, कलकत्ता, पुणे, बेंगलोर, अहमदाबाद, चेन्नई आदी मोठ्या बाजारांत मोठा उठाव आहे.'' 

- प्रशांत वाझे, फूल उत्पादक  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gulab Orchid and garnishiya flower receives a high rate in market