केशकर्तनालये, ब्युटी पार्लर्स आजपासून होणार सुरु; पण या आहेत अटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शासनाच्या आदेशानूसार उद्यापासून ( ता. 28) काही अटी व शर्तीचे पालन करुन केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना प्रतिबंध करण्यात आले होते. तथापि, शासनाच्या आदेशानूसार उद्यापासून ( ता. 28) काही अटी व शर्तीचे पालन करुन केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. मात्र वेळोवेळी जाहीर होणाऱ्या कंटेन्मेंट झोन हद्दीत हा आदेश लागू राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स सुरु करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्ती घालण्यात आली आहेत. फक्त निवडक बाबींनाच परवानगी दिली आहे. दुकानामध्ये काम करणाऱ्या कारागिरांनी हॅन्ड ग्लोज, प्रॉन, मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. दुकानामध्ये वापरणेत येणारे साहित्य व कमाची जागा (खुर्ची) प्रत्येक सेवेनंतर निर्जंतुकीकरण करणेत यावी. तसेच दुकानातील सामाईक वापर क्षेत्र व पृष्ठभाग (फरशी,लादी) प्रत्येक दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.

ग्रहकांसाठी एकदाच वापरता येणारे टॉवेल,रुमाल वापरणे व वापरानंतर त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असेल, विल्हेवाट न लावता येण्याजोगी उपकरणांची प्रत्येक सेवेनंतर स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.

वरीलप्रमाणे घालून दिलेल्या अटी व शर्ती या नोटीस स्वरुपात दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला दिसेल अशा दर्शनी जागेवर लावणेत यावे. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुध्द गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hairdressers, beauty parlors will start from today; But these are the conditions