अपंगांना मिळणार रंगीत "युनिक आयडी'

लुमाकांत नलवडे - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

देशात कोठेही चालणार - एक कार्ड-अनेक सुविधा
कोल्हापूर - अपंगांना आता रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. पिवळा, निळा आणि लाल रंगाचे हे कार्ड संबंधिताचे अपंगाचे प्रमाणही दाखविणार आहे. कार्डवर अपंगांना देशभरात कोठेही विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. नवीन वर्षात हे कार्ड सर्व अपंगांना मिळण्याची शक्‍यता आहे. देशभरातील अपंगांची संख्या, त्यांची माहिती या निमित्ताने एकत्रित होणार आहे. खऱ्या लाभार्थ्यांनाच याचा अधिकाधिक फायदा देण्याचा उद्देश यातून सफल होण्याची शक्‍यता आहे.

देशभरात किती अपंग आहेत, त्यांच्या अपंगत्वाची टक्केवारी किती आहे याची इत्यंभूत माहिती आता अधिकृत एकत्रित होणार आहे. केंद्र शासनाच्यावतीने सुरू झालेल्या युनिक आयडीच्या सुविधेतून ही माहिती पुढे येणार आहे. याचा फायदाही अपंगांना मिळणार आहे. हे रंगीत कार्ड आधार कार्डप्रमाणे देशात एकच असणार आहे. या कार्डवर अपंगांसाठी असलेल्या सुविधा देशात कोठेही घेता येणार आहेत. आधार कार्ड युनिक कार्डशी "लिंक‘ असेल. फोटोसह पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकासह इतर माहिती कार्डवर असणार आहे. अपंगांच्या सर्व सुविधांसाही एकच कार्ड पुरेसे ठरणार आहे. त्यामुळे हे कार्ड म्हणजे अपंगांसाठी एक महत्त्वाचा "ऐवज‘ ठरणार आहे. कार्डबाबतची सविस्तर माहिती दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील एका कार्यशाळेत देण्यात आली आहे. यामध्ये सीपीआर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषदेमधील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय (सीपीआर), जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा. www.svavlambancard.gov.in येथून माहिती घ्यावी.

मोबाइल आणि ईमेलवर योजनांची माहिती
युनिक आयडीमध्ये संबंधितांनी स्वतःचा मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी रजिस्टर करावा लागणार आहे. त्यावर अपंगांच्या विविध योजना, त्यांची माहिती, परिपत्रकांची माहिती मोबाइलवर आणि ईमेलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे अपंगांना त्यांच्या सुविधांसाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही.

असे असतील रंग आणि टक्केवारी

  • 40 टक्केपर्यंत अपंगांना पिवळा रंग
  • 40 ते 70 टक्केपर्यंत अपंगांना निळा रंग
  • 70 टक्केपेक्षा अधिक अपंगांना लाल रंगाचे ओळखपत्र दिले जाणार आहे.

ऑनलाइन माहिती भरावी लागणार...
युनिक आयडी मिळण्यासाठी अपंगांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म पूर्णपणे मोफत असेल. देशभरातून कोठूनही कोणत्याही ठिकाणचा फॉर्म ऑनलाइन भरता येणार आहे. याबाबतची सूचना आणि सविस्तर माहिती लवकरच सर्वत्र प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतरच युनिक आयडीबाबत फॉर्म भरता येणार आहेत.

Web Title: handicapped get Colored Unique ID