हातकणंगलेत काँग्रेससमोर अस्तित्वाचा प्रश्‍न

सुजित पाटील - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - विधान परिषद निवडणुकीपासून काँग्रेसशी फारकत घेतलेले माजी आमदार महादेवराव महाडिक आणि राहुल आवाडे यांना उमेदवारी डावलल्यापासून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडणारे प्रकाश आवाडे आता काँग्रेससोबत नसतील. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हातकणंगले तालुक्‍यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्यासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे यांना एकाकी लढत द्यावी लागणार आहे.

कोल्हापूर - विधान परिषद निवडणुकीपासून काँग्रेसशी फारकत घेतलेले माजी आमदार महादेवराव महाडिक आणि राहुल आवाडे यांना उमेदवारी डावलल्यापासून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडणारे प्रकाश आवाडे आता काँग्रेससोबत नसतील. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हातकणंगले तालुक्‍यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्यासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे यांना एकाकी लढत द्यावी लागणार आहे.

महाडिक, आवाडे व आवळे असे काँग्रेसमध्ये तीन गट होते; मात्र ते कधीच एकत्र आले नाहीत. आवळे- आवाडे हा संघर्ष जुनाच असून, त्यात विधान परिषदेपासून महाडिक यांची भर पडली. श्री. महाडिक ताराराणी आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या जवळ आहेत, तर ताराराणी आघाडी ही भाजपचा सख्खा भाऊ असल्याचे भाजप नेते नमूद करतात. जि.प. निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून श्री. आवळे सक्रिय झाले खरे; पण राहुल आवाडे यांचा पत्ता कट करून संघर्षही कायम ठेवला. पण, अन्य दोन ठिकाणी आवाडेंच्या विरोधात उमेदवार दिला नाही. यातून काँग्रेसने काय साधले, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे माने गट; पण माने गटानेही युवक क्रांती आघाडीचा झेंडा घेऊन भाजपशी घरोबा केला आहे. राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य अरुण इंगवले व महावीर गाट यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपचा रस्ता धरला. त्यामुळे राष्ट्रवादीही बॅकफूटवर गेली आहे.

भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडीच्या महायुतीत शिरोली, हातकणंगले, रेंदाळ, कबनूर, हुपरी, कोरोची हे सर्वाधिक ६ मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घेतले असले तरी ३ मतदारसंघांत त्यांची सारी भिस्त आयात उमेदवारांवरच आहे. जनसुराज्यने आपल्या प्रभावक्षेत्रातील भादोले, घुणकी आणि कुंभोज मतदारसंघांत उमेदवार दिले तरी घुणकी व कुंभोज येथे त्यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तगडे आव्हान आहे. डॉ. सुजित मिणचेकर येथे शिवसेनेचे आमदार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना प्रभावी ठरत नाही. त्यामुळे डॉ. मिणचेकरांनी काही ठिकाणी स्वबळावर, तर काही ठिकाणी आघाडीचे धोरण स्वीकारले आहे.

एकत्रित मोट बांधण्यात अपयश
भाजप-जनसुराज्यचा वारू रोखण्यासाठी हातकणंगले तालुक्‍यात स्वाभिमानी, काँग्रेस, शिवसेना यांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न झाले. ही आघाडी व्हावी, अशी कार्यकर्त्यांचीही अपेक्षा होती. यासाठी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार डॉ. मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या दोन बैठकाही झाल्या; मात्र जागावाटपाचा तिढा न सुटल्याने या आघाडीला मूर्त स्वरूप आले नाही. मिणचेकरांनी कुंभोजच्या जागेचा हट्ट धरला, तर जयवंतराव आवळे यांनी या आघाडीत सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली.

महाडिक गटाची लवचिक भूमिका
भाजप, जनसुराज्य, ताराराणीच्या जागावाटपात महाडिक गटाचे प्राबल्य असणाऱ्या काही ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे 
येथे गटाच्या कार्यकर्त्यांनी लवचिक भूमिका घेत काँग्रेस व अन्य पक्षांचे 
झेंडे खांद्यावर घेतले, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

Web Title: hatgangta congress