esakal | तो आठ दिवसांपासून चालतोय... गाव काही सापडेना 
sakal

बोलून बातमी शोधा

He has been walking for eight days ... but can't find his village

विभुतवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे कर्नाटक मधील बुदिहाळ (ता. बिळगी, जिल्हा बागलकोट )येथील मजूर दुपारी रखरखत्या उन्हामध्ये झाडाच्या सावलीला येऊन थांबला.

तो आठ दिवसांपासून चालतोय... गाव काही सापडेना 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

झरे : विभुतवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे कर्नाटक मधील बुदिहाळ (ता. बिळगी, जिल्हा बागलकोट )येथील मजूर दुपारी रखरखत्या उन्हामध्ये झाडाच्या सावलीला येऊन थांबला. बस स्थानकाशेजारी सावलीला बसलेल्या काही तरुणांना त्याने हातवारे करून पाणी मागितले, तरुणांनी लगेच त्याला पाणी दिले. काहीजणांनी त्याला बिस्कीट दिले. त्याची विचारपूस सुरु केली. 

त्याला हिंदी समजत नव्हते. इथे कुणाला कन्नड भाषा येईना. त्यामुळे मोठी पंचायत झाली. तो कुठला आहे हे समजेना. गावातीलच किशोर वाघमोडे या तरुणाने कर्नाटकमधील त्याच्या मित्राला फोन केला व दोघांचं संभाषण करून दिलं. त्यानंतर थोडेफार लक्षात आलं की हा कर्नाटकमधील आहे. 

शिवानंदच्या खिशातून एक डायरी मिळाली. त्या डायरीमध्ये कर्नाटकमधील एका व्यक्तीचा मोबाईल नंबर होता. त्याच्याशी सरपंच चंद्रकांत पावणे यांनी हिंदीतून संपर्क साधला असता. तो बुदिहाळ (ता. बिलगी, जि. बागलकोट) येथील असल्याचं समजलं. शिवानंद हा फुले विकण्याचं काम करतो. बरेच दिवसापासून तो महाराष्ट्रामध्ये कामासाठी गेला होता. मालकाचे आणि त्याचे काहीतरी बिनसल्याने त्याला गाडीतून उतरवण्यात आले. तो पाच दिवस झालं आपलं गाव शोधण्यासाठी चालतच राहीला. 

त्याच्याकडे ओळखीचा कोणताही पुरावा नाही. त्यांची ओळख पटवण्यासाठी अडचण झाली. गावकऱ्यांनी त्याला पाणी, बिस्कीट पुढे दिले व कराड पंढरपूर महामार्गाने जाण्यास सांगितले. तो त्या दिशेने भर उन्हात गेला. कपडे मळलेली होती, त्यामुळे तो वेडा आहे, असे बरेच जण म्हणत होते. परंतु मालकाने हाकलून दिल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी पाच दिवस तो पायपीट करतोय. मूळ गावात जाण्यासाठी आणखी किती दिवस पायपीट करावी लागणार याची त्याला कल्पना नाही. तरीही गावाकडे जाण्याची त्याची जिद्द आहे, त्यामुळे तो गावाकडे जाण्यासाठी चालतच राहिला.