त्या गावाच्या इतिहासाचा तो मूक साक्षीदार हरपला 

दीपक पवार
रविवार, 3 मे 2020

पारे (ता. खानापूर) येथील सव्वाशे वर्षांपूर्वीच्या इतिहासचा मूक साक्षीदार असलेले वडाचे झाड काळाच्या पडद्याआड गेला.

आळसंद : पारे (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सव्वाशे वर्षांपूर्वीच्या इतिहासचा मूक साक्षीदार असलेले वडाचे झाड काळाच्या पडद्याआड गेला. गुरुवार (ता. 30) दुपारी चार सुमारास झालेल्या विजेच्या कडकडासह वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने वडाचा वृक्ष जमीनदोस्त झाला. गावाच्या सुख- दु:खाचा असलेला वृक्ष कोसळल्याने गावकऱ्यांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळाखंडात गावाच्या स्माशनभूमीजवळ शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी अज्ञातांनी वडाचे वृक्षारोपण केले होते. कालांतराने त्याची सावली मोठी होऊ लागली, तसे गावकऱ्यांनी त्याभोवती कट्टा बांधून घेतला. त्या वृक्षाच्या छायेत अनेकांच्या सभा गाजलेल्या आहेत. शेकापचे नेते स्वातंत्र्यसैनिक भगवानराव सूर्यवंशी, स्वातंत्र्यसैनिक सदाबापू पवार, माजी आमदार शहाजीबापू पाटील, शिवप्रताप उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांचे हे गाव. 

वृक्षाच्या जागी पूर्वी तेली समाजातील एका दांपत्याचा तेलाचा घाणा होता. कालांतराने त्या वृक्षाच्या परिसराला घाण्याचा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला. 

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्ररेणादायी सभा याच ठिकाणी झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी व आमदार हाफिज धतुरे, राज्यमंत्री ना.डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी याच वृक्षाला राजकीय सभा गाजवल्या आहेत. तसेच यात्रेनिमित्त होणारे कार्यक्रम याच वृक्षाच्या सनिध्यात झाल्या आहेत. 

शामराव पाचेगावकर यांचा तमाशा गावात वीस वर्षांहून अधिक काळ याच झाडाखाली झाला आहे. सोंगाड्या जयवंत सावळजकर यांची कला याच वडाच्या झाडाखाली बहरली. अनेक स्पर्धा याच्या सानिध्यात झाल्या आहेत. देशभर गलाई निमित्त विखुरलेले बांधव या झाडाखाली बसून जुन्या आठवणींना उजाळा देत होते. असा ऐतिहासिक घटनांचा मूक साक्षीदार असलेला वृक्ष वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने जमीनदोस्त झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावकरी वृक्षाच्या आठवणीत अखंड बुडाले आहेत. 

नव्याने वृक्षारोपण करण्याचा मानस

"पारे गावाच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेले वडाचे झाड वादळी वाऱ्यात कोसळले. या झाडाखाली अनेक राजकारण्यांच्या सभा गाजलेल्या आहेत. आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. अनेकांनी आपली कला याच झाडाखाली सादर केली आहे. गावकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून नव्याने वृक्षारोपण करण्याचा मानस आहे.' 
- अभिजित शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, पारे (ता. खानापूर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He lost the silent witness to the history of the villege