esakal | गुढीपाडवा सणात आरोग्याचा जागर; कोरोनाचे सावट

बोलून बातमी शोधा

Health awareness during Gudipadva festival; Under shadow Corona

सलग दोन वर्षे मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा कोरोनाच्या सावटाखाली जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा यंदा लॉकडाउनमुळे जेमतेम साजरा होईल;

गुढीपाडवा सणात आरोग्याचा जागर; कोरोनाचे सावट
sakal_logo
By
अजित कुलकर्णी

सांगली : सलग दोन वर्षे मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा कोरोनाच्या सावटाखाली जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा यंदा लॉकडाउनमुळे जेमतेम साजरा होईल; पण कोरोनामुळे उपस्थित झालेल्या आरोग्य, शरीरातील प्रतिकारशक्‍ती या प्रश्‍नावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने बारकाईने विचार करण्याची वेळ आली आहे. दारी उभारण्यात येणारी गुढी ही जशी विजयाचे, समृद्धीचे प्रतीक आहे, त्याप्रमाणेच सर्वांगसुंदर आरोग्याची गुढी उभारण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित होत आहे. 


गुढीपाडवा हा फक्‍त एक पौराणिक सण न राहता त्याला अध्यात्म, निसर्ग यांसह सामाजिक महत्त्वही आहे. ऋतुमानानुसार पूर्वजांनी प्रत्येक सणाची रचना केल्याचा प्रत्यय येतो. वसंत ऋतुचे आगमन या दिवशी होत असून हवामान समशीतोष्ण व उत्साहवर्धक असते. झाडांची जुनी पाने गळून गुढीपाडव्याच्या सुमारास नवीन पालवीचा बहर सुरू होतो. 


कडुनिंब ही विविध रोगांवर मात करणारी वनस्पती असल्याने या दिवशी त्याचे मोठे महत्त्व आहे. सामर्थ्याचे प्रतीक म्हणून बांबूची काठी ही गुढी म्हणून उभारली जाते. पर्यावरण संवर्धनाचा विचार प्रत्येक गोष्टीत केला आहे. या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे. त्याची पाने, फुले, फळे, मुळे तसेच खोडही कडू असले तरी त्यात आयुर्वेदिक गुणधर्म ठासून भरले आहेत. चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मधात कडुनिंबाची पाने, फुले घालून तयार केलेला प्रसाद घेतला जातो.

त्याचप्रमाणे गुढीपाडव्यादिवशी सकाळी चणे डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ मिसळून तयार केलेली चटणीही शरीराची प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी सेवन करण्याची प्रथा आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाशक करणे, तसेच त्वचारोग बरा करण्याकामी हा पदार्थ उपयोगाचा आहे.

आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचे पाणी घालून केलेली आंघोळ ही आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. येणाऱ्या उन्हाळ्यापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी हे स्नान महत्त्वाचे आहे. नवीन वर्षाच्या येणाऱ्या भल्या बुऱ्या अनुभवांना सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी करण्यासाठी नववर्षाच्या प्रारंभीच कडुनिंबाच्या सेवनाला महत्त्व आहे.

संपादन : युवराज यादव