esakal | लॉकडाऊनमध्ये आरोग्य तंदुरुस्त; ओपीडी 50 टक्‍क्‍यांवर, औषधविक्रीही निम्म्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

Health fit in lockdown; OPD at 50 per cent, drug sales at half

सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, हात धुणे, सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण यासारख्या गोष्टी आता दररोजच्या सवयीच्या झाल्या आहेत. परिणामी गेल्या दीड महिन्यात आजारी पडणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. अर्थात यासाठी चांगल्या सवयी कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. 

लॉकडाऊनमध्ये आरोग्य तंदुरुस्त; ओपीडी 50 टक्‍क्‍यांवर, औषधविक्रीही निम्म्यावर 

sakal_logo
By
अजित कुलकर्णी

सांगली : कोरोना विषाणूमुळे दररोजच्या जगण्यात अनेक बदल घडताना दिसून येताहेत. विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल झाले. मात्र यातून काही सकारात्मक गोष्टीही समोर आल्या आहेत. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, हात धुणे, सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण यासारख्या गोष्टी आता दररोजच्या सवयीच्या झाल्या आहेत. परिणामी गेल्या दीड महिन्यात आजारी पडणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. अर्थात यासाठी चांगल्या सवयी कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. 

सुमारे दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने तो थोपवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे बनले होते. अनेकांना हा बंदिवास वाटला. दररोजच्या जगण्यातील मनमानीपणाला कुठेतरी ब्रेक लागल्यासारखे वाटत होते. हॉटेलिंग, शॉपिंग, पर्यटन, मनोरंजन, व्यसनावर निर्बंध आणल्यासारखी स्थिती आहे. स्वैर वागण्याला मुरड घालून कोरोनाच्या धास्तीने लोक घरीच राहू लागले आहेत. त्यामुळे जो तो लॉकडाऊन उठण्याची प्रतीक्षा करताना दिसत आहे. 

गेल्या दीड महिन्यात लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवलेय. हॉटेलिंग पूर्णपणे बंद झाल्याने बाहेरच्या खाण्याचा संबंधच राहिला नाही. घरचा ताजा, सकस आहार मिळाल्याने हॉटेल, हातगाड्यावरील तेलकट, चमचमीत, अस्वच्छ, कृत्रिम पदार्थांचा वापर केलेले फास्टफूड, महिना-दीड महिन्यात पोटात गेले नाही.

रस्त्याकडेला स्टॉल, गाड्यावरचे थंड पेय लॉकडाऊनमुळे दिसेनासे झाले. पान, तंबाखू, मावा, गुटखा, सिगारेट या टपरीवरच्या आरोग्यासाठी घातक पदार्थांची विक्री बंद झाली. मद्यपान करणाऱ्यांचे वांदे झाले असले तरी आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम थांबला. स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. सर्वात म्हणजे लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम यासारख्या संकल्पना राबवल्यामुळे सक्‍तीची विश्रांती मिळू लागली. त्यामुळे दररोज प्रवासात होणारी दगदग, धावपळ थांबल्याने आरोग्य चांगले रहात असल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबाला पुरेसा वेळ देता आल्याने ताण-तणाव उरले नाहीत. रस्त्यावर वाहने नसल्याने तसेच कारखाने बंद असल्याने हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणाला वावच नाही. त्यामुळे पर्यावरणाची आपसूकच जपणूक झाल्याचे चित्र आहे. 
एरवी सर्दी, पडसे, डोकेदुखी, अशक्‍तपणा आला तरी दवाखान्याची पायरी चढणारे गेल्या दीड महिन्यात "लॉक' झाल्याचे चित्र आहे. सुंठीवाचून खोकला गेल्यासारखा "फिल' रुग्णांना येत आहे. त्यामुळे दवाखान्यात जाण्याचे प्रमाण घटले आहे. औषध विक्रीही त्या प्रमाणात घटली आहे. लॉकडाऊनमध्ये हे सुचिन्ह मानायला हवे. 

किरकोळ आजाराचे प्रमाणही नगण्य

गेल्या 20 वर्षांच्या वैद्यकीय सेवेत पहिल्यांदाच सलग दोन महिने ओपीडी थंडावली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांची जीवनशैली सात्त्विक बनल्याचा प्रत्यय येत आहे. धावपळ, दगदग नसल्याने पुरेशी विश्रांती मिळाल्याने प्रतिकारशक्‍ती वाढली आहे. वातावरणात बदल होऊनही शुद्ध हवा, पाणी मिळत असल्याने किरकोळ आजारी पडणेही बंद झाले आहे. अनेकांनी व्यायाम, योगा यासारख्या गोष्टींची जोड देत आरोग्य चांगले राखले आहे. बहुतांश आजार पोटाद्वारे होतात. हॉटेलिंग थांबल्याने घरचे शुद्ध, सात्त्विक, साधे जेवण घेतल्याने किरकोळ आजाराचे प्रमाणही नगण्य आहे. 
- डॉ. मनोज पाटील, सांगली. 

औषध विक्रीत 50 टक्‍क्‍यांहून अधिक घट

लॉकडाऊन कालावधीत सुरवातीला लोक कोरोनामुळे अस्वस्थ होते. त्यामुळे मधुमेह, रक्‍तदाब असणाऱ्या रुग्णांनी जादा औषधे खरेदी केली. ग्रामीण भागात तसे आजारी पडण्याचे प्रमाण कमी आहे. त्यात अनेक डॉक्‍टरांनी दवाखाने बंद ठेवल्याने आहे ती औषधे पुढे चालू ठेवणे रुग्णांनी पसंत केले आहे. शहरी भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत लॉकडाऊनमुळे आमूलाग्र बदल झाल्याने आजार पळून गेले आहेत. त्यामुळे औषध विक्रीत जवळपास 50 टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली आहे. काऊंटर सेलही जेमतेम आहे. 
- बाळकृष्ण बेडगे, औषध व्यावसायिक. 

loading image